पुणे : ‘एकावर एक फ्री’च्या नावाखाली खवय्याची लाखाची फसवणूक | पुढारी

पुणे : ‘एकावर एक फ्री’च्या नावाखाली खवय्याची लाखाची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नामांकित जेवणाच्या थाळीची एकावर एक फ्री ऑफर देऊन सायबर चोरट्याने एका व्यक्तीला तब्बल एक लाख 1 हजार 722 रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी टिंगरेनगर येथील एका 46 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात प्रसिद्ध असलेल्या जेवणाच्या थाळीची ’एकावर एक फ्री’ अशी जाहिरात फिर्यादींच्या पत्नीला सोशल मीडियावर दिसली होती. त्यानुसार त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून क्रेडिट कार्डची माहिती भरून दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादींच्या पत्नीला फोन करून त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून दिली.

त्यांना ती लिंक क्लिक करण्यास भाग पाडून फिर्यादींच्या बँक खात्याती गोपनीय माहिती चोरी करून त्यांच्या खात्यातून 1 लाख 1 हजार 722 रुपये ऑनलाईन व्यवहार करून काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button