नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर | पुढारी

नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने थंडी गायब झाली असून, उकाड्यात प्रचंड वाढ झाली. वातावरणातील बदलाने शेतीपिकांना विशेष करून द्राक्ष, गहू व हरभऱ्याला फटका बसण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ऐन डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा दाब तसेच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावात वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात २ ते ५ अंशांने भर पडली. नाशिक शहराचा कमाल तापमानाचा पारा ३१.३ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहरातून थंडी गायब झाली असून, सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या किमान व कमाल तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यातच ढगाळ हवामान तयार झाल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, पुढील चार दिवस ढगाळ स्थिती कायम राहू शकते. त्यानंतर मात्र, थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे

९ डिसेंबरनंतर जिल्हावासीयांना पुन्हा एकदा हुडहुडी भरू शकते.

फुगवणीला फटका

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपिकांच्या फुगवणीला फटका बसू शकताे. तसेच फळपिकांत साखर उतरण्याचा हा हंगाम असताना बदललेल्या हवामानामुळे ही प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी द्राक्षबागांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. तसेच गहू व हरभरा पिकांसाठी हा कार्यकाळ महत्त्वाचा असतो. पण, सध्याच्या स्थितीमुळे या दोन्ही पिकांना अधिक धोका आहे. तसेच भाजीपाला, डाळिंब, रब्बीचा कांदा तसेच अन्य पिकांचेही नुकसान होेऊ शकते. अगोदरच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे.

हेही वाचा :

Back to top button