

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक मंदीच्या सावटामुळे अनेक मोठ्या कंपन्यांत नोकरकपात सुरु आहे. आता पेप्सी निर्माता पेप्सिको शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकणार (PepsiCo lay off) असल्याचे वृत्त आहे. पेप्सिको त्याच्या उत्तर अमेरिकन स्नॅक्स आणि शीतपेयांच्या वर्टिकलच्या मुख्यालयातील शेकडो कामगारांना नारळ देणार असल्याचे समजते. या कर्मचारी कपातीमुळे कंपनीच्या खरेदी तसेच स्नॅक्स आणि शीतपेय व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिकेतील स्नॅक्स आणि पॅकेज्ड-फूड व्यवसायाचे मुख्यालय अनुक्रमे शिकागो आणि टेक्सास येथे आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. पेप्सिकोने कर्मचार्यांना दिलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की कर्मचारी कपात कंपनीचा पुढील मार्ग सुलभ करण्यासाठी आहे. जेणेकरून आम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकू. स्नॅक्सच्या तुलनेत बेव्हरेजेस उद्योगात अधिक कर्मचारी कपात केली जाणार आहे. स्नॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देण्यात आली आहे.
पेप्सिको कोल्ड्रिंकशिवाय डोरिटॉस नाचोस (Doritos nachos, बटाटा चिप्स आणि क्वेकर ओट्स नावाचे स्नॅक्स बनवते. अन्नपदार्थ आणि शीतपेयांचे उत्पादन घेणाऱ्या या कंपनीमुळे जगभरात सुमारे ३ लाख ९ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. ज्यात अमेरिकेतील सुमारे १ लाख २९ हजार लोकांचा समावेश आहे.
पेप्सिको आणि इतर अन्नपदार्थ, शीतपेये उत्पादन घेणाऱ्या कंपन्या कच्चा माल (कॉर्न, साखर आणि बटाटे) तसेच वाहतूक आणि मजुरांवर होणारा वाढता खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. किमती वाढूनही किराणा दुकानांमध्ये अन्नपदार्थ आणि पेय पदार्थांची वाढती मागणी कायम आहे. (PepsiCo lay off)
उत्पादनांच्या वाढवलेल्या किमतीच्या जोरावर पेप्सिकोने पूर्ण वर्षाचा महसूल आणि कमाईत वाढ होणार असल्याचा अंदाज ऑक्टोबरमध्ये जाहीर केला होता. पेप्सिकोसह ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन, फेसबुकची मालकी असलेली मेटा, फूड डिलिव्हरी फर्म डोरडॅश, केबल टीव्ही नेटवर्क एएमसी नेटवर्क्स, बँकिंग जायंट सिटीग्रुप, मीडिया जायंट सीएनएन, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज क्रॅकेन, मॉर्गन स्टॅनले, चिपमेकर इंटेल, सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि एलन मस्क यांच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने याआधी नोकरकपात केली आहे.
हे ही वाचा :