‘अकरावी सीईटी नोंदणी रक्कम परत मिळणार’ | पुढारी

'अकरावी सीईटी नोंदणी रक्कम परत मिळणार'

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीसाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ रद्द केली. यामुळे या परीक्षेसाठी घेण्यात आलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे. ज्या गेटवेमधून फी भरण्यात आली आहे. त्यामार्फत विद्यार्थ्यांना त्यांना परत रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने म्हटले आहे.

गतवर्षी दहावीचा निकाल मुल्यमापनावर आधारित जाहीर झाल्याने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार होती. या सीईटीसाठी राज्यभरातून १० लाख ९८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या ४४ हजार विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईटीसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १७८ रुपये शुल्क घेण्यात आले होते. सीईटीच रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांनी केली होती. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांकडून सीईटीसाठी घेण्यात आलेले शुल्क त्यांना लवकरच परत करण्यात येणार आहे.

राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर २ हजार ५२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या संकेतस्थळावर ४१ हजार ५८२ विद्यार्थ्यांना ज्या पेमेंट गेव वे द्वारे व ज्या माध्यमातून परीक्षा शुल्क जमा केले आहे. त्याच मार्गाने प्रति विद्यार्थी रु १४३ रुपये प्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button