Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २२,६०० जवळ | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २२,६०० जवळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स, इन्फोसिस यासारख्या हेवीवेट शेअर्समधील तेजीच्या जोरावर बुधवारी (दि.२२) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वाढून बंद झाले. सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून ७४,२२१ वर बंद झाला. तर निफ्टी ६८ अंकांच्या वाढीसह २२,५९७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

बाजारात आज काय घडलं?

  • कमकुवत सुरुवातीनंतर सेन्सेक्स- निफ्टी वाढून बंद
  • निफ्टी ५० वर सिप्लाचा शेअर्स सर्वाधिक वाढला
  • रियल्टी आणि एफएमसीजी प्रत्येकी १ टक्क्याने वाढले
  • बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट
  • स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला

क्षेत्रीय निर्देशांकांची काय स्थिती?

क्षेत्रीय निर्देशांकात रियल्टी आणि एफएमसीजी प्रत्येकी १ टक्के आणि कॅपिटल गुड्स, आयटी आणि मीडिया प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर बँक आणि मेटल निर्देशांक प्रत्येकी ०.३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे ०.२ टक्क्यांनी वाढला.

बाजारात तेजी मर्यादित

बाजारातील सुरुवातीची तेजी मर्यादित होती. कारण अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (FOMC) बैठकीचा इतिवृत्तांत प्रसिद्ध होण्याआधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांक काही प्रमाणात वाढले होते.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, इन्फोसिस, एशियन पेंट्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर सन फार्मा, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, ॲक्सिस बँक, टाटा स्टील हे शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Sensex closing
Sensex closing

फायनान्सियल शेअर्समध्ये घसरण

एनर्जी आणि एफएमसीजी शेअर्समुळे संपूर्ण सत्रात निफ्टी ५० वाढला. दरम्यान, फायनान्सियल शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी ५० निर्देशांकावर सिप्ला, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कन्झ्यूमर, डॉ. रेड्डीज, कोल इंडिया हे टॉप गेनर्स राहिले. तर आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, सन फार्मा, ॲक्सिस बँक, श्रीराम फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स होते.

nifty 50
nifty 50

Cipla चा शेअर्स तेजीत

निफ्टी ५० वर सिप्लाचा शेअर्स टॉप गेनर राहिला. कारण सिप्ला कंपनीला यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (USFDA) कडून लॅनरिओटाइड इंजेक्शनच्या वापरासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सिप्लाचा शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी वाढला.

परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्सची का करत आहेत विक्री0

गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री सुरु आहे. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) सुमारे ३७,७०० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. त्यांनी गेल्या २१ ट्रेडिंग सत्रांमध्ये दररोज सरासरी १,८०० कोटी रुपयांची विक्री केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येईल तशी संदिग्धता वाढली आहे. यामुळे बाजारातील भयसूचकांक मापक इंडिया VIX देखील सुमारे ६७ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या नवीन उच्च पातळीपर्यंत पोहोचला आहे.

हे ही वाचा :

 

 

Back to top button