Praveen Darekar on Gajanan Kirtikar: कीर्तिकरविरुद्ध महायुती वाद चिघळला; दरेकरांचा गजानन कीर्तिकरांवर मोठा आरोप | पुढारी

Praveen Darekar on Gajanan Kirtikar: कीर्तिकरविरुद्ध महायुती वाद चिघळला; दरेकरांचा गजानन कीर्तिकरांवर मोठा आरोप

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार, व आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, असा शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Praveen Darekar on Gajanan Kirtikar)  यांनी केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. त्या दृष्टीने वागणूक दिली. परंतु कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता. ते आता स्पष्टपणे बाहेर येत असल्याचेही दरेकर म्हणाले. ते आज (दि.२२) पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रवीण दरेकरांचा गजान किर्तिकरांवर कोणता आरोप?

  • अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील.
  • दुसरा कुणी उमेदवार नसेल
  • गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार,
  • आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे.

दरेकर (Praveen Darekar on Gajanan Kirtikar)  म्हणाले की, पुण्यातील कार अपघाताचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीस यांनी केला आहे. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता. त्या पबवरही कारवाई झालेली आहे. त्यामुळे विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Praveen Darekar on Gajanan Kirtikar : धंगेकरांची पराभूत होणार असल्याचे नौटंकी सुरू

रविंद्र धंगेकर आणि निलेश लंके यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, रविंद्र धंगेकर एकदा आमदारकीत विजय मिळाल्यामुळे समजात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. धंगेकरांना केवळ या विषयाचे राजकारण करायचे आहे. धंगेकर पराभूत होणार असल्याचे माहित असल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. निलेश लंकेही त्याच धाटणीतील आहेत. त्यांचाही पराभव होणार आहे. बाळूमामा म्हात्रेही भिवंडीतून हरणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले, ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता. त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? अनिल देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोला दरेकरांनी लगावला.

दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबईत सहाच्या सहा जागा भाजपा आणि शिवसेना जिंकेल. राज्यात ४५ पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू. परंतु ४० च्या वर भाजपा व महायुती शंभर टक्के जागा जिंकू ४० च्या खाली एकही जागा नसेल, असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.

निवडणूक यंत्रणेच्या अव्यवस्थेचा पर्दाफाश अधिवेशनात करणार

दरेकर म्हणाले की, निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू, तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे काम आहे. त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे. या दुरवस्थेला जे जबाबदार आहेत. त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी. मी प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो. मतदान केंद्रे वातानुकुलित असावी, वेटिंगच्या जागाही वातानुकुलित असाव्यात, एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत, जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज आहे. येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश मी करणार आहे.

हेही वाचा 

Back to top button