Raut vs Pawar : संजय राऊतांचे पवारांना प्रत्‍युत्तर, “‘सामना’ला महत्त्व द्या असं…” | पुढारी

Raut vs Pawar : संजय राऊतांचे पवारांना प्रत्‍युत्तर, "'सामना'ला महत्त्व द्या असं..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘सामना’ ला महत्त्व द्या, असं मी म्हणत नाही.  मी माझ्या पक्षाचे मत मांडत असतो. कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनीही मत मांडावे. त्यांना कोणती विचारधारा आहे, हे त्यांनी सांगावे. मी माझे मत मांडतच राहणार, अशा शब्‍दांमध्‍येठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्‍ट्रावादीचे अध्‍यक्ष शऱद पवारांना प्रत्‍युत्तर दिले. (Raut vs Pawar)

राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्‍यात अपयश आल्‍याची टीका सोमवारी ( दि. ८ ) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्‍हणाले होते की, आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू द्या, आम्ही आमचं काम करत असतो.  संजय राऊत रोज सकाळी बोलतात. यामुळे महाविकास आघाडीमध्ये गैरसमज निर्माण होतात. त्यांनी बोलणे थांबवावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं हाेतं.

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “मी माझे मत मांडत असतो. राज्याचे आणि देशाचे प्रश्नांवर बोलत असतो. यावर कोणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनीही आपले मत मांडावे. मी यापुढेही बोलत राहणारच. ‘सामना’ ला महत्त्व द्या, असं मी म्हणत नाही. मी माझ्या पक्षाचे मत मांडतच राहणार.”

Raut vs Pawar : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यंदा इतिहास घडेल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैशाचा पूर आला. महाराष्ट्रातील  खोकी संस्कृती एकनाथ शिंदेंनी बेळगावातही राबवली, असा आराेपही त्‍यांनी केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यंदा इतिहास घडेल. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे भाकितही त्‍यांनी या वेळी केले. मणिपूरमध्ये हिंसाचार घडत होता तेव्‍हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकाच्या प्रचारात गुंतले होते. हे नेते भाषण माफिया आहेत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button