कर्नाटक निवडणूक :  ना टीका, ना टिप्पणी; यंदाची निवडणूक थोडी वेगळी! | पुढारी

कर्नाटक निवडणूक :  ना टीका, ना टिप्पणी; यंदाची निवडणूक थोडी वेगळी!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  यंदा कर्नाटकातील निवडणूक चुरशीची बनली असली, तरी कोणताही स्थानिक उमेदवार आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर व्यक्तिगत टीका करताना दिसत नाही. राष्ट्रीय नेत्यांचे विषसर्प, विषकन्या असे सुरू असले तरी अपवाद वगळता स्थानिक उमेदवारांनी मात्र टीका टिप्पणीपेक्षा स्वतःच्या प्रचारावर अधिक लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. अपवाद वगळता बेळगाव जिल्ह्यात बहुतांशी मतदार संघात एकास एक अशीच टक्कर होत असल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

म ए समितीची धसका

गेल्या तीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आपापसात भांडून पायावर दगड मारून घेतला. यावेळी बेळगावपासून खानापूरपर्यंत समितीने प्रत्येक मतदार संघातून एकच उमेदवार दिला आहे. परिणामी राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. ते जरी निवडून येण्याचा दावा करीत असले, तरी यावेळी त्यांना दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ, असा फायदा घेता येणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने सावध पवित्रा घेतला आहे. राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार कोणावरही व्यक्तिगत टीका करताना दिसला नाही. आपला प्रचार, आपल्या प्रचाराला गर्दी कशी जमवता येईल. बाहेरून कोणत्या नेत्यांना आणता येईल, यामध्ये तो अधिक गर्क राहिले.

काही उमेदवारांनी अप्रत्यक्षरित्या टीका करण्याचा प्रयत्न केला, तरी तो मर्यादित स्वरूपाचा होता. खालच्या पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी करण्याचा प्रकार या निवडणुकीत एकाही उमेदवाराकडून दिसला नाही. उमेदवारांच्या प्रचारासाठी जे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते आले, त्यांनीही केंद्रातील योजना सांगताना केवळ विरोधी पक्षांची नावे घेऊन टीका केली. उमेदवाराची व्यक्तिगत माहिती घेऊन लाखोली वाहिली गेली नाही, हे विशेष म्हणावे लागेल.

गेल्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता काही उमेदवारांनी यावेळी ताकही फुंकून पिण्याचा प्रकार सुरू आहे. कारण, ज्या चुका मागे झाल्या त्या आता नकोत, असा पवित्रा घेतला आहे. टीका झालीच तर कोरोना काळात हे उमेदवार कुठे होते, त्या पक्षाच्या पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, आम्ही विकास केला आहे, त्यांनी काय केले, अशी अप्रत्यक्ष टीका झाली.

आयोगाचा धाक

निवडणूक आयोगाने काय बोलावे यावरही निर्बंध घातले असल्याने त्याचाही हा परिणाम असू शकतो. विकास आणि आपली कामे दाखवण्यावर तसेच त्यांनी पाच वर्षात कशा भूलथापा दिल्या, अशा दिशेने बहुतांशी प्रचार राहिला.

Back to top button