महिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी; प.रे.ची १३ हजार पुरुष प्रवाशांवर कारवाई | पुढारी

महिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी; प.रे.ची १३ हजार पुरुष प्रवाशांवर कारवाई

मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  पश्चिम रेल्वेत महिला प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या १३ हजार ६१ पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते १५ डिसेंबर या दरम्यान केलेल्या कारवाईत महिलाच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या पुरुषांकडून ३७ लाख ६८ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

उपनगरीय लोकलमध्ये महिला प्रवाशांकरिता राखीव डब्बे आहेत. बारा डब्यांच्या लोकलमध्ये तीन डबे महिलांसाठी राखीव असतात.या डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरी देखील पुरुष प्रवासी या डब्यातून प्रवास करतात. कधी-कधी चुकून पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यात चढतात, कधी-कधी सोबतच्या महिला प्रवाशाला मुंबईची माहिती नसल्याने अशा विविध गोष्टींच्या नावाखाली पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांवर आऱपीएफद्वारे कारवाई करण्यात येते.

जानेवारी ते १५ डिसेंबर या कालावधीत महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या १३ हजार ६१ पुरुषांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ३७लाख ६८हजारांचा दंड वसुल केला आहे. महिलांच्या राखीव डब्यात पुरूष प्रवाशी अढळल्यास रेल्वे अ‍ॅक्ट १६२ नुसार ५०० रूपये दंड आकारण्यात येतो. तर संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल झाल्यास व प्रकरण न्यायालयात गेल्यास त्याला किमान एक हजार रूपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

पश्चिम रेल्वे आरपीएफने महिला सुरक्षेबाबत तीन हजारहून अधिक जनजागृती मोहिमा मुंबई सेंट्रल विभागात वेगवेगळ्या उपनगरीय स्थानकांवर घेतल्या आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षेसाठी आरपीएफने महिला आरपीएफ कर्मचार्‍यांचा समावेश असलेली विशेष टीम देखील सुरू केली आहे.

हेही वाचा

Back to top button