पंजाब, हरियाणा, हिमाचलसह दिल्लीत कोणाला संधी? | पुढारी

पंजाब, हरियाणा, हिमाचलसह दिल्लीत कोणाला संधी?

अजय सेतिया (विश्लेषण)

लोकसभेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात 115 जागांचा फैसला होणार असून, गेल्या वेळी भाजपने त्यातील 59 जागांवर विजय मिळवला होता. यापैकी 23 जागा पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या प्रदेशांतील होत्या. दिल्ली आणि हरियाणात तर भाजपने क्लीन स्वीप केला होता. यावेळचे चित्र काय सांगते, याचा आढावा घेणे रंजक ठरेल.

हरियाणा

भाजपला यावेळी हरियाणात क्लीन स्वीप करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही, असे दिसून येते. त्यामुळे भाजपने सहा जागांवर उमेदवार बदलले आहेत. रोहतक, हिस्सार, सिरसा आणि कुरुक्षेत्र या जागांवर भाजपला काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार गुप्ता यांना भाजपचे नवीन जिंदाल यांच्याशी दोन हात करायचे आहेत. गेल्या वेळी नायब सैनी यांनी येथून विजय मिळवला होता. सध्या तेच विद्यमान मुख्यमंत्री आहेत. रोहतक, हिस्सार, सिरसा येथेही भाजपसाठी सोपी लढत राहिलेली नाही. यातील सिरसा मतदार संघात काँग्रेसच्या कुमारी सैलजा यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.

गुरुग्राम, कर्नाल आणि फरिदाबाद या तीन ठिकाणी भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. गुरुग्राममध्ये काँग्रेसने राज बब्बर यांना तिकीट दिले आहे. भाजपचे राव इंद्रजित सिंह यांचा विजय त्यामुळे पक्का मानला जात आहे. कर्नालमध्ये माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही विजय सुकर बनला आहे. फरिदाबादमध्ये भाजपला विजयासाठी फारशी अडचण दिसत नाही. सोनिपत आणि भिवानी येथे मात्र भाजपला काँग्रेसने जोरदार आव्हान दिले आहे. त्यामुळे गेल्या वेळप्रमाणे सर्व दहा जागांवर विजय मिळवणे भाजपसाठी कठीण बनल्याचे चित्र दिसत आहे.

दिल्ली

गेल्या पंचवीस वर्षांपासून दिल्लीत जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, त्याच पक्षाचे सरकार केंद्रात स्थापन होते, असे समीकरण बनले आहे. 2004 मध्ये काँग्रेसने सहा जागा जिंकल्या व त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले. नंतर असाच प्रकार भाजपच्या बाबतीत दिसून आला. यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या युतीचे आव्हान भाजपसमोर उभे ठाकले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत अजूनही परस्परांबद्दल अविश्वासाची भावना दिसून येत आहे. ही भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते. आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्लीतून, तर काँग्रेस पक्ष चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली व उत्तर पश्चिम दिल्लीतून मैदानात उतरला आहे. आम आदमी पक्षासाठी या निवडणुका म्हणजे अस्तित्वाची लढाई बनल्या आहेत. त्यातच स्वाती मालिवाल कथित मारहाण प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याचे दिसून येते. तरीही खबरदाराची उपाय म्हणून भाजपने सहा जागांवर नवे चेहरे दिले आहेत. त्याचा कितपत लाभ झाला, याचे उत्तर चार जून रोजी मिळेल.

पंजाबात चौरंगी लढती

पंजाब

पंजाबमध्ये भाजपचा फारसा प्रभाव कधीच नव्हता. शेतकरी आंदोलन आणि अकाली दलाशी युती तुटल्यामुळे भाजपला या राज्यात बॅकफूटवर जावे लागले आहे. यावेळी भाजप सर्व तेरा जागा स्वबळावर लढवित आहे. यातील दोन उमेदवार अकाली दलातून आलेले, एक उमेदवार आम आदमी पक्षातून आलेला, तर चौघे काँगे्रसमधून आलेले आहेत. तिघे जण निवृत्त नोकरशहा आहेत. म्हणजेच भाजपचे स्वतःचे केवळ तीन उमेदवार आहेत. पंजाबमध्ये यावेळी आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप आणि काँग्रेस हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातच खरी लढत आहे. गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागांवर जिंकलेल्या अकाली दलाला यावेळी अस्तित्वासाठी लढावे लागत आहे.

हिमाचल प्रदेश

भाजपला गेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांत हिमाचलमध्ये भरभरून यश मिळाले होते. यावेळी पुन्हा एकदा भाजप तशाच विजयाची अपेक्षा बाळगून आहे. येथील मंडी मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी बनली आहे. या मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी तथा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सिंह यांनी बाजी मारली होती. यावेळी त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह मैदानात आहेत. लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणावत यांना भाजपने त्यांच्या विरोधात मैदानात उतरविले आहे.

या हायप्रोफाईल लढतीकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. हा सामना चुरशीचा होण्याचे संकेत मिळत आहेत. हमीरपूरमधून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विजय मिळवणे कठीण जाणार नाही, असा अंदाज आहे. सिमला आणि कांगडा या दोन मतदार संघातही भाजपला काँग्रेसच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच यावेळी भाजप सर्व चारही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही, असे दिसून येते.

हेही वाचा 

Back to top button