‘कलेक्टर’ पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता : जिल्हा पोलिस दलात फेरबदलाचे संकेत | पुढारी

‘कलेक्टर’ पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता : जिल्हा पोलिस दलात फेरबदलाचे संकेत

दीपक देशमुख

यवत : आचारसंहिता संपताच जिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून, ‘आर्थिक कलेक्टर’ची भूमिका बजाविणार्‍या पोलिसांना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे जिल्हा मुख्यालयात जमा करून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी मे महिन्यात ज्या कर्मचारी आणि अधिकारीवर्गाचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाला, त्यांच्या बदल्या इतरत्र केल्या जातात. परंतु, सध्या लोकसभा आचारसंहिता असल्याने दि. 4 जूननंतर या सर्व बदल्या होणार आहेत.

पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदाची चार महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतलेल्या पंकज देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणार्‍या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाची माहिती गोपनीय पद्धतीने संकलित केल्याचे समजते. त्यानुसारच अनेकांना आता मुख्यालयाचा रस्ता पाहायला मिळू शकतो.

ज्या कर्मचार्‍यांबाबत वारंवार सर्वसामान्य नागरिक तक्रार करीत आहेत किंवा ज्या कर्मचार्‍यांचे अवैध व्यवसाय करणार्‍यांशी लागेबांधे आहेत, अशा कर्मचार्‍यांना आता पोलिस मुख्यालयात जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वादग्रस्त ठरणार्‍या सर्वच अधिकारी आणि कर्मचार्‍यांबाबत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे कठोर निर्णय घेणार असून, याचा फटका आता नेमका कोणाकोणाला बसणार, याची चर्चा जिल्हा पोलिस दलात रंगू लागली आहे.

वादग्रस्त अधिकारी, कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

पंकज देशमुख यांनी आत्तापर्यंत ज्या ठिकाणी काम केले, त्या ठिकाणी त्यांनी अवैध धंदे करणारे आणि त्यांना मदत करणार्‍या पोलिस यंत्रणेला चांगलेच वठणीवर आणण्याचे काम केले आहे. त्यातच पुढील पाच-सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे संकेत असून, अशा वादग्रस्त कर्मचार्‍यांना त्याच पोलिस ठाण्यात ठेवणे म्हणजे राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. त्यामुळे पंकज देशमुख हे अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करणार आहेत.

निवडणूक काळात मुंबईत पाठवून दिली झलक

पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी एकप्रकारची धास्तीच घेतली होती. त्यातच ‘कलेक्टर’ पोलिसांना लोकसभा निवडणूक काळात मुंबई शहरात बंदोबस्तासाठी पाठवून एकप्रकारचा इशाराच त्यांनी कर्मचारीवर्गाला दिला आहे. बंदोबस्तासाठी बाहेर पाठविलेले सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या होणार नसल्या, तरीही काही वादग्रस्त कर्मचार्‍यांना मात्र कलेक्शन सोडून मुख्यालयात जावेच लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button