कस्तुरबा हॉस्पिटल कर्मचारी सेवा निवासस्थान इमारतीमध्ये जिने चढ-उतारकडून कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक | पुढारी

कस्तुरबा हॉस्पिटल कर्मचारी सेवा निवासस्थान इमारतीमध्ये जिने चढ-उतारकडून कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  कस्तुरबा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसाठी वडाळा येथे बांधण्यात आलेल्या सेवा निवासस्थान संक्रमण शिबिरातील सात मजली इमारतीची लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिने चढ-उतार करताना मोठी दमछाक होत आहे. याचा सर्वाधिक त्रास सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचारी व गरोदर महिलांना होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

कस्तुरबा हॉस्पिटलमधील कर्मचारी सेवानिवासस्थानातील इमारती 2014 मध्ये धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना तातडीने संक्रमण शिबिरात जाण्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले मात्र कर्मचाऱ्यांनी सहा महिन्याचा वेळ मागून घेतला. 2015 मध्ये कर्मचारी वडाळा येथील सात मजली संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले. सुरुवातीच्या काळात इमारतीची डागडूजी व अन्य मेंटेनन्स वरचेवर होत होते.

मात्र आता इमारतीच्या डागडुजीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सात मधली इमारतीला एकमेव लिफ्ट असून ती गेल्या वर्षभरापासून बंद आहे. याबाबत प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र थातूरमातूर दुरुस्ती करून लिफ्ट सुरू करण्यात येते. पण काही तासातच ती पुन्हा बंद पडते. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना जिने चढत घर गाठावे लागत आहे.
गेल्या वर्षभरापासून लिफ्ट बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक त्रास सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आई-वडिलांना गरोदर महिलांना होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी कस्तुरबा हॉस्पिटल प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे. आजही लिफ्ट बंद असून येथील रहिवाशांना जिन्यावरून चढ-उतार करावी लागत आहे. दरम्यान इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातही अस्वच्छता पसरली असून त्याकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्यावेळी वाहनातील पेट्रोल चोरीसह अन्य चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. पण पालिका प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची खंतही येथील रहिवाशांनी व्यक्त केली. दरम्यान लवकरच लिफ्टची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे कस्तुरबा हॉस्पिटलचे अधीक्षक चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

.हेही वाचा

सीमाप्रश्‍नी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा : लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांची मागणी

ठाणे : तिकीट विचारले म्हणून ‘टीसी’वर प्रवाशाचा ब्लेडने हल्ला 

रायगड: मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस- कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू; १० जखमी  

Back to top button