ग्रेडसेपरेटरमध्ये मर्ज इन, आऊटचा खेळ; पालिकेकडून वाहतूक व्यवस्थेत पुन्हा बदल

 ग्रेडसेपरेटरमध्ये मर्ज इन, आऊटचा खेळ; पालिकेकडून वाहतूक व्यवस्थेत पुन्हा बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दापोडी ते निगडी मार्गावर महापालिकेतर्फे सातत्याने विविध प्रयोग केले जात आहेत. नव्याने भुयारी मार्ग करणे तसेच, मर्ज इन आणि मर्ज आऊट बदलण्याचा महापालिकेने जणू पायंडाच पाडला आहे. या सततच्या बदलामुळे वाहनचालक वैतागले आहेत. वाहतूक सुरळीत होण्याऐवजी वाहनचालकांना विरुद्ध बाजूने ये-जा करण्यास चालना मिळत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे दोन भाग करणारा दापोडी ते निगडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा 61 मीटर रुंदीचा आठ पदरी ग्रेडसेपरेटर मार्ग आहे. ग्रेडसेपरेटर मार्गात वाहनांना प्रवेश करण्यासाठी 'मर्ज इन' आणि बाहेर पडण्यासाठी 'मर्ज आऊट' आहेत. त्याची वाहनचालकांना सवय झाली आहे. मात्र, महापालिकेकडून या मर्ज इन आणि मर्ज आऊटमध्ये पालिकेकडून पुन्हा बदल केले जात आहेत.

महापालिकेने मर्ज इन व मर्ज आऊट दोन वेळा बदललेले आहेत. वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून काही ठिकाणी बदल करण्यात आला. महामेट्रोने आपल्या कामासाठी अनेक ठिकाणी मर्ज इन आणि मर्ज आऊट तोडले असून, काही ठिकाणी नव्याने मर्ज आऊट तयार केले आहेत. हे बदल वाहतूक नियमांना धरून न झाल्याने अनेक ठिकाणी वाहनचालकांची गल्लत होते. रचना बदलल्याने वाहने बिनदिक्कत विरुद्ध दिशेने ये-जा करतात. प्रशासनाच्या या धरसोड भूमिकेमुळे वाहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

अपघातांना निमंत्रण देणारे कठडे

मर्ज इन व मर्ज आऊटचे कठडे तुटलेले व अर्धवट स्थितीत आहेत. वारंवार बदल केल्याने काही ठिकाणचे कठडे धोकादायक स्थितीत आहेत. काही ठिकाणचे गतीरोधक अर्धवट स्थितीत आहेत. पांढरे पट्टे असलेले रम्बलर स्ट्रिप्स उखडून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एकाच ठिकाणी मर्ज इन व मर्ज आऊट असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पावसाचे पाणी, चिखल साचत असल्याने वाहनांचे विशेषत: दुचाकीस्वाराच्या अंगावर घाण पाणी व चिखल उडतो. काँक्रिटच्या रस्त्यांना भेगा पडल्याने दुचाकीचे चाक घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुभाजकांचे काँक्रिटचे कठडे तुटले आहेत. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, खराळवाडी, निगडी भागांत नागरिक धोकादायकपणे ग्रेड सेप्रेेटर मार्ग ओलांडतात.

4.5 मीटरपेक्षा जास्त उंच वाहनांचा रोखण्याकडे दुर्लक्ष

ग्रेड सेप्रेटरमध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीचे वाहने अडकून पडतात. पिंपरी चौक, मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ चौक या ठिकाणी ग्रेड सेप्रेटरमध्ये उंच वाहने अडकतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. वारंवार वाहने धडकल्याने वरील बाजूचे काँक्रीट निघाले आहे. उंच वाहनांनी ग्रेड सेप्रेटरमध्ये प्रवेश करू नये, म्हणून महापालिकेकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. पहाटेच्या सुमारास अधिक उंचीची वाहने ग्रेड सेप्रेटरला अडकतात, त्याला आम्ही काय करणार, असे सांगून महापालिकेचे अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.

सिग्नल फ्रीकडे दुर्लक्ष

दापोडी ते निगडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा ग्रेड सेप्रेटर मार्ग सिग्नल फ्री करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. बारा वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही हा मार्ग अद्याप सिग्नल फ्री झालेला नाही. नाशिक फाटा व फुगेवाडी येथे असे दोन सिग्नल आहेत. त्यासंदर्भात ठोस भूमिका घेतली जात नसल्याने महापालिकेचा सिग्नल फ्री मार्गाचा दावा फोल ठरला आहे. दापोडी ते निगडी या मार्गावर दुहेरी बीआरटीएस मार्ग आहे. बीआरटीतून आलेली पीएमपीएलची वाहने सर्व्हिस रस्त्यावरून वेगाने धावतात. त्यांना स्वतंत्र सिग्नल आहे; मात्र या सिग्नलला न जुमानता अनेक चालक बेदकारपणे बस दामटतात; तसेच खासगी वाहनेही बीआरएस मार्गात घुसखोरी करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. वाहनांना विनासिग्नल थेट जाता यावे म्हणून मर्ज इन आणि मर्ज आऊटची नव्याने रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करून; तसेच वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. वाहतूक सुरक्षेच्यादृष्टीने महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत, असे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

मर्ज इन, मर्ज आऊटची नियोजित रचना

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news