तळेगाव रेल्वे स्टेशन बनले धोकादायक; निधीनंतरही विकासकामे ठप्प | पुढारी

तळेगाव रेल्वे स्टेशन बनले धोकादायक; निधीनंतरही विकासकामे ठप्प

जगन्नाथ काळे

तळेगाव स्टेशन : सहा महिन्यांपूर्वी सुस्थितीत असलेल्या तळेगाव रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी अमृत भारत योजनेतंर्गत सुमारे 36 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर आनंदाचा पारावार राहिला नसलेल्या प्रवाशांना आज ‘जुनं ते सोनं’ म्हणण्याची पाळी आली आहे.

फलाटावर राडारोडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीत या रेल्वेस्टेशनच्या निधीची ऑनलाईन घोषणा आणि विकासकामांच्या प्रारंभाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात केले होते. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने तोडफोडीचे काम जोरदार सुरू केले; मात्र योजनेत समाविष्ट असलेल्या तिकिट घर, सुसज्ज फलाट, प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या सुविधांची कामे अर्धवट असून, केवळ सुशोभीकरणाच्या कामांवरच मोजके कारागिर काम करत असल्याचे चित्र आहे. दैनिक पुढारी प्रतिनिधीने स्टेशनची पाहणी केली असता जागोजागी खोदलेले फलाट, फलाटावर आणि आसपास टाकलेला राडारोडा, अस्ताव्यस्त टाकलेले बांधकाम साहित्य आणि अडगळीत ठेवलेली बाकडी आणि धोका पत्करुन येजा करत असलेले प्रवासी निदर्शनास आले.

सुशोभीकरणाच्या कामांवर भर

केंद्र सरकारने अमृत भारत योजनेतंर्गत चिंचवड आणि तळेगाव स्टेशनच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. दोन वर्षांपूर्वी लोणावळा स्टेशनचे काम वेळेत पूर्ण झाले आहे. चिंचवड स्टेशनच्या विकासाचे कामही वेगाने होत आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली तळेगाव स्टेशनच्या पायाभूत विकासाची कामे ठप्प पडली आहेत. केवळ सुशोभीकरणाच्या कामांवरच ठेकेदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून प्रवाश्यांना धोके पत्करून फलाटावर वावरावे लागत आहे. याबाबत स्टेशनच्या व्यवस्थापकांची भेट घेतली असता त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या अधिकारकक्षात येत नसल्याचे कारण सांगून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

रेल्वे प्रवाशी संतप्त

याबाबत काही प्रवाशांबरोबर चर्चा केली असता त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयातील गतीशक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प अधिकारी (सीपीएम) उपाध्याय यांचेही तळेगाव रेल्वे स्टेशनच्या विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी संघाचे सदस्य तानाजी तोडकर यांनी केला.

.. कामे ठप्प पडली

दरम्यान, सीपीएम उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघटना याबाबत मूग गिळून गप्प असल्याचा आरोप करत ती कोमात गेली आहे काय, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑन लाईन भूमिपूजन होऊन 36 कोटींचा निधी घोषित केलेल्या कार्यक्रमानंतर कामेही सुरू करण्यात आली. आता मात्र ती कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे स्टेशनची दुरवस्था झाली आहे. स्टेशनवरील प्लॅटफार्मच्या जुन्या फरशा काढल्याने प्रवाशांना गैरसोयीचे होत असून, अधूनमधुन तेथे धुळीचे कण उडून प्रवाशांना त्रासदायक होत आहे.

तळेगाव रेल्वे प्रशासन ठेकेदारांकडे चौकशी करा, असे सांगतात.मुंबई-पुणे-मुंबई दिशेने जाणार्‍या एक्सप्रेस गाड्या आणि लोणावळा-पुणे-लोणावळा लोकलच्या फेर्‍यानी प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी, कामगार, मजूर, नोकरदार यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तळेगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सततची वर्दळ आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर पुण्याच्या दिशेने जाणार्‍या फलाटावरील परिस्थिती पावसाळ्यात अधिक धोकादायक होण्याची शक्यता असल्याचे प्रवासी अनिल वेदपाठक यांनी सांगितले.

सरकारी नोकरीनिमित्त मी गेली 40 वर्षे तळेगाव ते शिवाजीनगर असा प्रवास केला. तळेगाव स्टेशन हे कधीही नव्हते इतके आज उजाड केले गेले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून प्रवाशांसाठी ज्या सुविधांना पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने करायला पाहिजेत, त्या करत असल्याचे दिसत नाही. फलाटावर माती, सिमेंट, भुकटीचा राडारोडा टाकलेला आहे. प्रवाश्यांना बसण्यासाठी आणलेली सुमारे 120 बाकडी अडगळीत ठेवली आहेत.

– तानाजी तोडकर, प्रवासी संघ सदस्य

 

भरउन्हाळ्यात पंख्याची व्यवस्था तकलादू आहे. स्वच्छतागृहात अस्वच्छता आहे. तेथे डासांचे साम्राज्य आहे. बाकडी काढून ठेवली आहेत. काम मात्र संथ गतीने चालू आहे. पुण्याकडे जाणारा फलाट असुरक्षित आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत फलाट सुरक्षित करावेत.

– ऋतुज कल्याणी, रेल्वे प्रवासी विद्यार्थी

हेही वाचा 

Back to top button