चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटेंचा अपघात : देवेंद्र फडणवीस | पुढारी

चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटेंचा अपघात : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटेंचा अपघात झाल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात केले. विनायक मेटेंचं रस्ते अपघातात निधन झालं होतं. यावर आज विधिमंडळ सभागृहात चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. यावेळी विनायक मेटेंच्या अपघाताबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं.

यावेळी फडणवीस म्हणाले- ड्रायव्हर भांबावलेला होता. चालकाने केलेला फोन खरा की खोटा याची शहानिशा व्हायला पाहिजे. ड्रायव्हर लोकेशन नीट सांगू शकला नाही. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. भविष्यात अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. १११ ला फोन केल्यानंतर लोकेशन कळणं गरजेचं आहे. यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचं आहे. दोषींवर कारवाई करा.

यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न निवेदनाद्वारे मांडले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करणं गरजेचं आहे. लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी वेगळी मार्गिका व्हायला हवी. ड्रायव्हर सतत जबाब बदलत असल्याने शंका निर्माण होते. सरकार नेमकी कोणती कारवाई करणार? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवारांकडून सरकारकडे विशिष्ट मागण्या करण्यात आल्या.

पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की- चालक सतत जबाब बदलतोय हे खरं आहे. ८ पदरी मार्गाचा विचार करू. रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा. याबाबत, सरकार सकारात्मक पाऊल उचलेल. घटनेनंतर सुरुवातीला चर्चा होते, प्रश्न मागे पडतो. घातपात आहे किंवा नाही, याचा तपास सीआयडीला करण्यास सांगण्यात आले आहे. घातपाताचा तपास सीआयडीने केला पाहिजे.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले- रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवासाला दुप्प्ट वेळ लागतो. रस्त्यांच्या दुरावस्थेवरही सभागृहात चर्चा झाली.

Back to top button