ठाणे : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जेजे रुग्णालयात दाखल | पुढारी

ठाणे : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जेजे रुग्णालयात दाखल

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची प्रकृती बिघडली असून त्यास नियमित तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी तसेच खंडणीच्या गुन्ह्यात त्याला ठाणे पोलिसांनी अटक केली असून तो सध्या ठाणे कारागृहात आहे.

कासकर याच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोन, तर कासारवडवली पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. याच दरम्यान इक्बालवर ठाणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गतदेखील कारवाई केली. ठाणे कारागृहात असलेल्या कासकरला आजार जडल्याचा दावा करीत त्याच्या वकिलांनी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी ठाणे सत्र न्यायालयाकडे अर्ज करून मागितली होती. त्याच्या वकिलांनी जेजे किंवा सेंट जॉर्जमध्ये उपचाराची परवानगी मागितली होती. त्यानुसार,न्यायालयाने कारागृह प्रशासनाला तसे आदेश दिले होते. परंतु, शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याने कारागृह अधिकार्‍यांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय उपचार वादाच्या भोवर्‍यात कासकर याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने 19 सप्टेंबर 2017 रोजी नागपाडा येथून अटक केली होती. तेव्हापासून कासकर ठाणे तुरुंगात असून त्याच्या विरोधात मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यापासूनच कासकर सारखी वैद्यकीय उपचार हवेत अशी मागणी न्यायालयासमोर करीत आहे. कधी पाय दुखतोय, तर कधी
दाढ दुखतेय अशी कारणे कासकर व त्याचे वकील वारंवार न्यायालयासमोर मांडत आहेत. मध्यंतरी आपल्याला दाढदुखीचा त्रास होत असून त्यावर उपचार मिळावेत, अशी मागणी कासकर याने ठाणे तुरुंगात केली होती.

या उपचारासाठी न्यायालय आणि जेल प्रशासनाने मुभा दिली होती. त्यानुसार कासकर याला वैद्यकीय उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते. कारागृहाच्या मागणीनुसार ठाणे पोलीस मुख्यालयातून कासकरला रुग्णालयात नेण्यासाठी पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. दातांची तपासणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी
कासकर याला मधुमेह असल्याने शुगर तपासणीचा सल्ला दिला. अवघ्या 20 मिनिटांत कासकरचे उपचार उरकण्यात आले. त्यानंतर कासकरचा ताबा घेतलेल्या पोलिसांनी त्याला बिर्याणीची मेजवानी खाऊ घातली होती. इतकेच नव्हे तर, कासकर याला फोनवरून बोलण्याचीदेखील मुभा देण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पाचही पोलिसांच्या निलंबनाचे आदेश देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Back to top button