काँग्रेस बॅकफूटवर! वादग्रस्त वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा यांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | पुढारी

काँग्रेस बॅकफूटवर! वादग्रस्त वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा यांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक हल्ल्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर आली होती. पित्रोदा यांच्यावर कारवाई करण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढला होता. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत चांगली लढत देणाऱ्या काँग्रेसला कोणतीही मोठी चूक करायची नाही. मात्र पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे. राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्यातील जवळीक पाहून काँग्रेसला कठोर पावले उचलण्याचे धाडस करता आले नाही.

दरम्यान, याविषयी काँग्रेस पक्षनेतृत्वाने राहुल गांधींशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर राहुल गांधींनी स्वतः पित्रोदा यांना राजीनामा देण्यास सांगितले. राहुल गांधी यांना विचारल्यानंतरच पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी तो लगेचच स्वीकारला. मात्र, औपचारिकपणे काँग्रेसने या गोष्टीला पित्रोदा यांचा निर्णय असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सॅम पित्रोदा यांनी स्वेच्छेने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विशेष म्हणजे सॅम पित्रोदा यांनी वारंवार दिलेल्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता. दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी त्यांनी संपत्ती कर’ या विषयावर बोलून त्यांनी भाजपला काँग्रेसविरुद्ध आयता मुद्दा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्या टप्प्यात या मुद्द्यावरून काँग्रेसविरोधात प्रचार केला होता. आता चौथ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भारतीय लोकांच्या रंगाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी काँग्रेसवर त्वचेच्या रंगाच्या आधारे देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button