मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ | पुढारी

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी रात्री पावसाचा जोर ओसरला असताना पुन्हा बुधवारी सकाळी पावसाने जोर पकडला. मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी तुंबले. हिंदमाता येथे तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा झाला. दरम्यान, हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पालिकेने आपत्कालीन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई शहर व उपनगरात पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार बॅटिंग केली. मंगळवारी रात्री थोडी उसंती घेतलेली असल्यामुळे शहरात तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र बुधवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी या गाड्या पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत आहेत. रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता लोकल सेवेसह रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.

मुंबईत पुढील 4 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 आणि 8 जुलैला मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने विभागीय कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान पावसाचा जोर असल्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही रोडावली आहे. वसई, विरार, नालासोपारा भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे या भागातून मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांनी घरी राहणे पसंत केले. त्यामुळे लोकल ट्रेनला नेहमीपेक्षा कमी गर्दी होती.

हेही वाचलंत का?

Back to top button