आज महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांत मतदान | पुढारी

आज महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांत मतदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या आठ लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होत आहे. या मतदारसंघांतील दीड कोटी मतदार 204 उमेदवारांतून आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. अकोल्याचा अपवाद वगळता बहुतेक मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे.

महाराष्ट्रात 19 एप्रिलला झालेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानात गडचिरोली, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या पाच मतदारसंघांत मतदान झाले होते. आता शुक्रवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांत मतदान होणार आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे.

लक्षवेधी लढती

अकोला व अमरावती मतदारसंघांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर,  आनंदराज आंबेडकर हे रिंगणात उतरले असल्याने हे दोन्ही मतदारसंघ चर्चेत आहेत. याशिवाय भावना गवळींना उमेदवारी नाकारल्याने यवतमाळ-वाशिम मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. नवनीत राणांमुळे अमरावती, महादेव जानकर व बंडू जाधव यांच्यामुळे परभणी मतदारसंघ तसेच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड मतदारसंघामधील लढती लक्षवेधी ठरतील. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दीड कोटी मतदार

दुसर्‍या टप्प्यात एकूण 16 हजार 689 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे 18 हजार 471 सेवा मतदार, तर 12 डी अर्जाद्वारे 85 वर्षांवरील व दिव्यांग असे एकूण 14 हजार 612 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Back to top button