भुशी धरण ओव्हरफ्लो....लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 166 मिमी पावसाची नोंद | पुढारी

भुशी धरण ओव्हरफ्लो....लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 166 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 166 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे मात्र यासाठी पोलिसांची मेहेरनजर असणं आवश्यक असणार आहे.

सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर आणि रात्री देखील मुसळधार पडणाऱ्या पावसाने बुधवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण दोनच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे . स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोऱ्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला मात्र फ्लो जास्त असल्याने ते शक्य झालं नाही. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात लोणावळा शहरात एकूण 251 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मागील वर्षी जून महिन्याच्या 19 तारखेलाच भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. त्यामानाने यंदा धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी 6 जुलै उजडायला लागलं. भुशी धरणाच्या पायर्यांवरून फेसळत वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी मागील दोन्ही विकेंडला पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र या विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना तो आनंद घेता येणार असल्याने या शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.

पोलिसबल वाढविण्याची आवश्यकता, अन्यथा आगामी विकेंड भगवान भरोसे

कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे भुशी धरण पर्यटकांना बंद असल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला होता. मात्र यंदा अशी कोणत्याही स्वरूपाचे निर्बंध नसल्याने पोलिसांना मोठा ताण सहन करावा लागणार आहे हे निश्चित. त्यातच लोणावळा पोलिसांकडे मर्यादित पोलीस बळ असल्याने मागील दोन आठवड्यात वाहतूक व्यवस्थेचा उडालेला खेळखंडोबा बघता या आठवड्यात तर त्याहूनही वाईट परिस्थितीचा सामना पर्यटक आणि स्थानिकांना करावा लागणार आहे.

लोणावळा पोलिसांकडून धरणाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रायवूड पार्क आणि नौसेना बाग याठिकाणी पोलीस पोस्ट लावण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी तैनात करण्यास पोलिसच उपलब्ध नसल्याने त्या पोस्टचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणं आवश्यक आहे. अन्यथा आगामी विकेंडला येथील वाहतुकीची परिस्थिती ही केवळ भगवान भरोसे असेल यात तिळमात्र शंका नाही.

Back to top button