देवेंद्रजी रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट | पुढारी

देवेंद्रजी रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून एकनाथ शिंदे यांना भेटायचे, असे अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. देवेंद्र फडणवीस आणि मी अंधार झाल्यावर भेटत होतो. सत्तांतर एका दिवसात झालेले नसल्याचे शिंदे यांनी सभागृहात म्हटले होते.

देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिले. मुख्यमंत्री पद न मिळाल्याने देवेंद्रजींना कोणताही फरक पडणार नसल्याचेही अमृता फडणवीस यांनी नमूद केले आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत. हे आम्हाला आधीच माहित झाले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उठाव केला, त्या आमदारांना आम्ही साथ दिली आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलो. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच भाजप श्रेष्ठींना दिला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात सांगितले होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकर्‍यांचे, विकासाचे अनेक प्रकल्प थांबले होते. महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दररोज दिसत होता. शिवसेनेसमोरचे प्रश्‍न तर मोठे होते. त्यांच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतल्याने अस्वस्थता अधिक होती. यातून शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा राजकारण कसे अचानक बदलते आणि क्षणात नव्हत्याचे होते करते, याचा प्रत्यय आला. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे-फडणवीस सरकारने सेमिफायनल जिंकली आणि आज विश्वासमत जिंकून विधानसभेतील फायनल मॅच तूर्तास तरी जिंकली आहे.

शिवसेनेतून पन्नास आमदार सोबत घेऊन शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठारे यांनाच आव्हान देऊन आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला. त्यांना भाजपची साथ (की प्रेरणा?) मिळाली. विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर फ्लोअर टेस्टदेखील शिंदे सरकारने जिंकली.

Back to top button