बारामतीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ; संगणकीय प्रणालीद्वारे पार पाडली प्रक्रिया | पुढारी

बारामतीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ; संगणकीय प्रणालीद्वारे पार पाडली प्रक्रिया

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 516 मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक 9 हजार 58 बॅलेट युनिट, 3 हजार 569 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 825 व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदान केंद्रनिहाय दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत ही सरमिसळ करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रूपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या 120 टक्के बॅलेट आणि 141 टक्के कंट्रोल युनिट, तर 152 टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारीस्तरावर 5 एप्रिल रोजी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय सरमिसळनंतर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 3 हजार 569 बॅलेट युनिट, 3 हजार 569 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 825 व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button