शक्तिप्रदर्शनासह शिरूरसाठी आढळराव-पाटीलांची उमेदवारी दाखल; अजित पवार उपस्थित | पुढारी

शक्तिप्रदर्शनासह शिरूरसाठी आढळराव-पाटीलांची उमेदवारी दाखल; अजित पवार उपस्थित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे  उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मतदारसंघातील महायुतीचे सर्व आमदार, नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि.25) शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखानादरम्यान भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पक्ष यांसह इतर घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हलग्यांचा कडकडाट, ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी अबकी बार चारसो पार, आमचे उमेदवार आमचे दादा.. निवडून येणार शिवाजी दादा, एकच वादा शिवाजी दादा,.. अशा घोषणांनी परिसर

दुमदुमून सोडला होता.

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उघड्या रथामधून उपमुख्यमंत्री अजित पवार, उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करत होते. या वेळी आमदार चेतन तुपे, अतुल बेनके, महेश लांडगे, दिलीप मोहीते-पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजप नेत्या आशा बुचके, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद उपस्थित होते.
दरम्यान, रॅली डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर खंडुजीबाबा चौकात आढळराव यांच्यासह पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांची संयुक्त सभा होणार होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर होऊ नये, म्हणून रॅली डेक्कन बसस्टॉपजवळ आल्यानंतर अजित पवार, आढळराव पाटील व अन्य नेते तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

ग्रामदैवताचे घेतले दर्शन..

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सकाळी लांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन घेऊन गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी लांडेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा

Back to top button