शिंदे-ठाकरे गटात विभागली बालेकिल्ल्यातील शिवसेना | पुढारी

शिंदे-ठाकरे गटात विभागली बालेकिल्ल्यातील शिवसेना

ठाणे; दिलीप शिंदे : अन्यायाविरोधात उठाव करा, बंड करा या बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार मी शिवसेनेत 39 आमदारांसह उठाव केला. या घडामोडीत आपली माणसे ओळखता आली, माझ्याशी कोण कसे वागले, काय बोलले याची नोंद घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाश्रमाच्या साक्षीने ठाणेकरांकडून स्वागत स्वीकारताना जाहीर केले. कारण ठाण्याचा पहिला मुख्यमंत्री होऊन देखील आपल्या कर्मभूमीतील, बालेकिल्ल्यातील खासदार, काही जिल्हाप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी यांनी जाहीरपणे साथ दिली नाही, एवढेच नाहीतर स्वागताकडेही त्यांनी पाठ फिरवली. यातून ठाणे जिल्ह्यातील शिवसेना ही ठाकरे – शिंदे गटात विभागली गेल्याचे दिसून येते.

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला पहिला मुख्यमंत्री लाभला आहे. त्याचे स्वागत ठाणेकरांनी पावसात भिजत केले. शिवसेनेतील बंडाला ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे चित्र होते. मात्र खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्यासह अनेक जुने नेते, आजी माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ जाहीर भूमिका घेतली नाही. फक्त माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे आणि काही नगरसेवकांनी, पदाधिकार्‍यांनी शिंदे यांच्या सोबत ठाम उभे राहून ठाण्याचा किल्ला लढविला. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी गप्प राहून बघ्याची भूमिका घेतली होती. शिवसेना सोडायची नाही, पुढे काय होते ते पाहू? धनुष्य बाण कुणाला मिळते, यावर शिंदे गटात सामील व्हायचे की ठाकरे यांची साथ सोडायची या द्विधा मनस्थितीत आहेत. त्याचमुळे काही अपवाद वगळता कुणी शिंदे अथवा ठाकरे यांच्याविरोधात आवाज उठविलेला नसल्याचे गेल्या 15 दिवसांच्या घडामोडींवरून दिसून येते.

विश्वास सार्थक ठराव मंजूर झाल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यात आले आणि त्यांचे भर पावसात शिंदे समर्थकांनी जंगी स्वागत केले, त्यावेळी व्यासपीठावर अथवा आनंदाश्रमात निवडक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार यांनी अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. ठाण्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथील अनेक प्रमुख पदाधिकार्‍यांनी, शिवसैनिकांनी स्वतःला दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले.

आगामी निवडणुकांमध्ये नेमके चित्र स्पष्ट होणार

पदाधिकार्‍यांनी ठाकरे की शिंदे यापैकी कुणाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा, अशी खुलेपणाने भूमिका घेतली नसल्याने सर्वसामान्य शिवसैनिक संभ्रमात पडलेला आहे. त्याचवेळी काही पदाधिकार्‍यांनी गुपचूप ठाकरे यांना भेटून समर्थन दिले, तर काहींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही पदाधिकार्‍यांनी दोघांनाही भेटून साहेब आम्ही तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिल्याचे समजते. हे संशयास्पद चित्र ठाणे जिल्ह्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदे असे गट निर्माण झाल्याचे संकेत देत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या उठावात आपली माणसे कोण, याची नोंद घेतल्याचे जाहीर केल्याने त्याचे पडसाद आगामी काळात कसे उमटतात, यावर आगामी निवडणुकांचे चित्र अवलंबून असेल.

मुख्यमंत्र्यांच्या घरी ठाकरे पिता-पुत्र

हिंदुत्व आणि अन्यायाच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिंदे समर्थकांनी लावलेल्या होल्डींग, बॅनर, सोशल मीडिया आणि जाहिरातींवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाले आहेत. फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो निघालेले नाहीत. यातून अनेक प्रकारचे संदेश मिळतात.

Back to top button