मोहरम च्या मिरवणुकीला मुंबईत सशर्त परवानगी | पुढारी

मोहरम च्या मिरवणुकीला मुंबईत सशर्त परवानगी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मोहरम साठी प्रतिकात्मक शोक मिरवणूक आयोजित करण्यास याचिकाकर्त्यांना न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सशर्त परवानगी दिली. या मिरवणुकीत केवळ लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच सामील होण्याची परवानगी असेल असे खंडपीठाने ही परवानगी देताना स्पष्ट केले. केवळ सात ट्रकमधून प्रत्येकी ट्रकमध्ये केवळ 15 जणांना मुभा देताना पायी मिरवणूक काढण्यास मात्र मनाई केली आहे.

कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव सध्या कमी झाल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना कोरोनाचा संभाव्य धोका ध्यानात ठेवूनच प्रत्येक धर्मियांनी यावर्षी आपले सण उत्सव साजरे करावेत असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोहरम च्या निमित्ताने 20 ऑगस्टला मिरवणुकीला परवानगी द्या, अशी विनंती करणारी याचिका ऑल इंडिया इदारा-ए-तहफुज-ए-हुसेनियात या संघटनेच्यावतीने उच्च न्यायायात दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती के.के. तातेड आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने याचिकेला विरोध केला. या वार्षिक मोहरमच्या मिरवणुकीत हजारो शिया मुस्लिम सहभाग घेतात आणि सध्याची परिस्थिती पाहता त्याला परवानगी दिली जाऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. याची दखल न्यायालयाने घेतली.

गेल्या वर्षी न्यायालयाने दिलेल्या परवानगीच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीही दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिरवणूक काढण्याची सशर्त परवानगी दिली. या मिरवणूकीत सात ट्रकांना परवानगी देताना एका ट्रकात जास्तीत जास्त 15 जणांना परवानगी देण्यात आली आहे.

मार्गावरील शेवटच्या 100 मीटर अंतरावर फक्त पाच जणांना ‘ताजिया’ चिन्हासह पायी चालण्यास परवानगी देण्यात आल्याचेही खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. तसेच या ताजियात सामील होणा-या प्रत्येकाने त्यांच्या घरांचे पत्ते मुंबई पोलिसांकडे देणे बंधनकारक असून गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मिरवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 144 सह सर्व आवश्यक निर्बंध लागू कऱण्याचे निर्देशही खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

डोंगरी ते माझगाव कबरीस्तान पर्यंत ट्रकमधून निघणार मिरवणूक

* लसीकरण पूर्ण झालेले भाविकाच ताजिया मिरवणूकीत सहभागी

* कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव सध्या कमी झाल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका ध्यानात ठेवूनच प्रत्येक धर्मियांनी यंदाच्यावर्षी आपले सण उत्सव साजरे करावेत असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. तसेच हे निर्देश याचिकाकर्त्यांना केवळ मुंबई पुरतेच मर्यादित असून ते राज्यात इतरत्र कुठेही लागू होणार नाहीत असेही खंडपीठाने आपल्या आदेशांत स्पष्ट केले.

लसीकरण पूर्ण झालेल्या भाविकांनाच ताजिया मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी

* सात ट्रक मधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी, एका ट्रकवर 15 जणांना मुभा
* डोंगरी ते माझगाव कबरीस्तान पर्यंत ट्रकमधून निघणार मिरवणूक
* मिरवणुकीच्या शेवटी 105 पैकी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी

Back to top button