विशेष मुलाखत : मोदींच्या विकास रथाला महाराष्ट्र गती देईल : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

विशेष मुलाखत : मोदींच्या विकास रथाला महाराष्ट्र गती देईल : मुख्यमंत्री शिंदे

आरोप करायला काही लागत नाही; पण विरोधकांनी नीट डोळे उघडून माझ्या सरकारच्या कामाकडे पाहावे, असे आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “माझे सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाच्या प्रयत्नांना गती द्या. ‘महायुती’ला साथ द्या आणि भारत महासत्ता बनत असताना त्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे असेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत ‘पुढारी न्यूज’ चॅनलचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी मुंबई ते शिर्डी या मुख्यमंत्र्यांच्या विमान प्रवासात घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या तडाखेबंद उत्तरांनी राजकारणाचा पट उलगडला.

प्रश्न ः या निवडणुकीत झंझावाती प्रचार दौरे सुरू आहेत. लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडविणे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांशी झुंज देत विजय मिळविण्याचा प्रयत्न करणे, हे एकप्रकारचे राजकीय धर्मयुद्धच आहे, असे 2024 च्या निवडणुकीला पाहून वाटतेय. समोर दुसरी शिवसेना आहे, त्यांच्याशी तुम्ही लढताय, यातना होत नाहीत? वेदना होत नाहीत? हे काय चाललंय?
मुख्यमंत्री शिंदे : युद्ध युद्धासारखे लढले जाते. निवडणुका निवडणुकांसारख्या लढायला पाहिजेत. समोर आता तुम्ही म्हणालात की आपलेच लोक आहेत. त्याला कारणीभूत तेच लोक आहेत. एवढे टोकाचे पाऊल, मोठा निर्णय आम्ही घेतला. याला तेवढी टोकाची आणि मोठी कारणेही आहेत. शिवसेना या चार अक्षरांसाठी, बाळासाहेबांसाठी आणि त्यांच्या विचारांसाठी माझ्यासारखे शेकडो, हजारो, लाखो कार्यकर्ते पक्षावर जीव ओवाळून टाकतात, घरादारांवर तुळशीपत्र ठेवतात आणि पक्ष, संघटना, शिवसेना 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण, हा बाळासाहेबांचा मूलमंत्र ते देतात आणि जेव्हा त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्याबद्दल कटकारस्थान करतात, त्यांना राजकीय जीवनातून संपविण्याचा त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा घाट घालतात, त्यावेळी दु:ख होते. शेवटी हा राजकीय कार्यकर्ता जो असतो, त्याला घडायला वेळ लागतो. मोठा व्हायला वेळ लागतो. त्याला घालवायला वेळ लागत नाही. महाभारतात जशी लढाई झाली, तशी ही निवडणूक म्हणजे लोकशाहीतील वैचारिक लढाई आहे. परंतु, आम्ही निवडणुका असू द्या, नसू द्या, आमचं काम करत असतो.
प्रश्न ः शिवसेनेतून बाजूला व्हायचा निर्णय घेतलात. त्यामागील भूमिका काय?
मुख्यमंत्री शिंदे : बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे समोरचे जे लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाची भूमिका सोडली. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केलाय आणि जे बाळासाहेबांना नको होते, ती काँग्रेस त्यांनी खांद्यावर घेतली, डोक्यावर बसविली आणि सत्तेची खुर्ची मिळवली. काय मिळाले त्यांना आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला.
प्रश्न ः असे सांगितल जाते की, उद्धव ठाकरे आजारी होते. त्यांच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होणार होती आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांनी कट केला, गद्दारी केली, हे काय वास्तव आहे.?
मुख्यमंत्री शिंदे : फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रचार सुरू आहे. जेव्हा आम्ही निर्णय घेतला, त्याच्याअगोदर एक दिवस वर्धापन दिन होता. वर्धापन दिनामध्ये त्यांनी (उद्धव ठाकरे) भाषण केले आणि अनेक शिवसैनिकांचा आईच्या नावावर उद्धारदेखील केला. आईचे दूध विकणारी औलाद अशाप्रकारचे भाष्य त्यांनी केले. ते कुणालाही आवडले नाही. खूप दिवसांनंतर हा निर्णय आम्ही घेतला. हा शिंदे लपूनछपून काम करत नाही. घेतला निर्णय घेतला. जे काय परिणाम होतील त्याला सामोरे जायची माझ्यात हिंमत आहे. बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. घाबरलो नाही. जो निर्णय घेतला महाराष्ट्राच्या हितासाठी, शिवसैनिकांच्या हितासाठी, शिवसेना वाचविण्यासाठी व धनुष्यबाण वाचविण्यासाठी.
प्रश्न ः एकनाथ शिंदे यांचे ब्रँडिंग आणि लॉचिंग व्हावे म्हणून धर्मवीर चित्रपट तयार करण्यात आला, असा आरोप होतो?
मुख्यमंत्री शिंदे ः हे साफ खोटं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर सिनेमा निघू नये, अशी त्यांची अपेक्षा होती. कारण दिघे यांना बाळासाहेबांच्या एवढी लोकप्रियता मिळालेली होती. याची चिंता आणि जेलसी सर्वांना होती. बाळासाहेब खुल्या मनाचे होते. दिघेंवर प्रेम करायचे. मात्र, इतर लोक दिघे यांच्याविरुद्ध कंड्या पिकवायचे, कारस्थान करायचे. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय मिळविले. ते गेल्यानंतर मला आनंद दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, असे विचारण्यात आले. याचा मला धक्का बसला. मी सांगितलं, तो फकीर माणूस आहे. त्याच्याकडे आहे काय. तर मला माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. सोन्यासारखा माणूस गेला त्याचे शल्य नाही; पण त्याची प्रॉपर्टी शोधा ही त्यांची नजर.
प्रश्न ः उद्धव ठाकरे यांचा वचननामा प्रसिद्ध झाला. तुमचे काय?
मुख्यमंत्री शिंदे ः तो गुळगुळीत आणि मुळमुळीत आहे. तोही खाली पडला. त्यांना सांभाळता आला नाही. वचननामा पकडायला मनगटात जोर पाहिजे. जे जनपथला वाकतात त्यांच्या मनगटात कोणती आली ताकद. तुम्ही बाळासाहेबांना एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे दिलेले वचन पाळले नाही. स्वतः मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत टुमकन बसले.
प्रश्न ः अमित शहा यांनी बंद खोलीत वचन दिलं होतं. त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे करतात. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करणार होतो, असे सांगतात. मात्र, शिवसैनिकाला त्यांनी दिलेल्या वचनाचे काय?
मुख्यमंत्री शिंदे ः मला मुख्यमंत्री व्हायचे नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे आहे आणि पालखीत बसवायचे. पण ते स्वतः पालखीत बसले आणि सांगितले की मला पवारांनी मुख्यमंत्री व्हा असे सांगितले. मात्र, ते निखालस खोटे आहे. त्यांची स्वतःचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, स्वप्न होते. मात्र, बाळासाहेबांमुळे ते पूर्ण होत नव्हते. सत्तेचे पद आपण घ्यायचे नाही, असे बाळासाहेब म्हणत. मात्र, यांना सत्तेचा मोह होता. त्यांनी ते मिळविले. पुढचा इतिहास माहीत आहे.
प्रश्न ः शेतकर्‍यांसाठी काहीच केले जात नाही, असा आरोप होतो आहे?
मुख्यमंत्री शिंदे ः आरोप करायला काही लागत नाही. खोटं बोला पण रेटून बोला, अशी त्यांची भूमिका आहे. केंद्र व राज्याकडून शेतकर्‍यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात. एक रुपयात पीकविमा दिला जातो. 35 हजार कोटींच्या योजना सुरू आहेत. संकट काळात मदत दिली जाते. त्यासाठी नियम बाजूला ठेवले. सौरऊर्जा प्रकल्प आणला. वीज सवलत दिली. 122 सिंचन प्रकल्प आणले आहेत. 20 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू केले. नदीजोड प्रकल्प सुरू केले. दुष्काळी भागाला पाणी वळविण्याची योजना आखली. अनेक योजना राबविल्या जात आहेत. लोकांना योजनेचा लाभ मिळत आहे. शासन जनतेच्या दारी जाऊन लाभ देत आहे. पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला आहे. आरोग्य योजना पाच लाख रुपयांपर्यंत नेली. सर्व अटी काढून टाकल्या. सर्व जनता यामध्ये कव्हर केली. देशात पायाभूत सुविधांचे काम प्रथम क्रमांकाचे आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. तो पूर्वी मागे गेला होता. त्यांना डोळे उघडून पाहायला सांगा.
प्रश्न ः ठाकरे शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आपल्याला खोके सरकारची उपमा दिली जाते, त्याचे काय?
मुख्यमंत्री शिंदे ः शेतकर्‍यांचा मुलगा मुख्यमंत्री झालेले त्यांना आवडले नाही. त्यांच्या पचनी पडलेले नाही. धनदांडग्यांनीच व सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हावे का? मी सामान्यांच्या वेदना जाणतो. त्यांच्या अडचणी सोडवतो. त्यांच्यासारखा घरात बसत नाही तर बांधावर जातो. महिला, युवकांशी बोलतो. यांना काय. शिव्या द्यायचे, मिंधे सरकार, खोके सरकार म्हणायचे. आता पातळी सोडून नीच, निर्लज्ज म्हणून शिव्या देतात. मी शिवी देणार नाही. जनताच ते मनावर घेईल आणि बहुजन समाज येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल. माझ्यावर खोक्याचे आरोप करता. मात्र, तुम्हाला तर खोक्याशिवाय झोपही येत नाही आणि चैनही पडत नाही. लंडनला कशाला जाता? खोके ठेवायला जाता ना?
प्रश्न ः धनुष्यबाण आणि मशालीच्या लढाईकडे कसे पाहता?
मुख्यमंत्री शिंदे ः बाळासाहेबांचा धनुष्यबाण लोकांच्या मनामनात आहे. म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत.
प्रश्न ः महाविकास आघाडी ठाकरे शिवसेनेने वीस जागा घेतल्या. शिंदेंना भाजप आघाडीत आहे त्या जागाही टिकविता आल्या नाहीत, त्याबाबत काय?
मुख्यमंत्री शिंदे ः आमच्यात समन्वय आहे. मतभेद नाहीत. सांगलीत गळ्यात गळा पायात पाय, अशी स्थिती आहे. निवडून किती येणार हे सांगा.
प्रश्न ः महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला गेले, हे ऐकून मराठी माणसाच्या छातीत धस्स होतं. वास्तव काय?
मुख्यमंत्री शिंदे ः हा बदनाम करण्याचा डाव आहे. एक कंपनी गेली. कंपनीला काय पाहिजे यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यामुळे ती कंपनी गेली. दाओसला गेल्यावर्षी 1 लाख 37 हजार कोटीची गुंतवणूक करार केले. 80 टक्के गुंतवणूक आली. आता 4 ते 5 लाख कोटींचे करार झाले असून, त्याला सर्व मदत केली जात आहे. तुम्ही काय आणले?
प्रश्न ः मुस्लिम धर्मियांचा मुद्दा निवडणुकीत येतो. त्यावर काय भूमिका?
मुख्यमंत्री शिंदे ः मुस्लिमांना काँग्रेसने व्होट बँक म्हणून वापरले. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. मौलाना आझाद महामंडळाला 30 कोटी रुपये दिले जात होते. ते आम्ही 500 कोटी दिले. मुस्लिम वस्तीत नागरी सुविधा दिल्या 3 हजार कोटी रुपयांची योजना या समाजासाठी राबविली. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देते. ते जात बघून दिले जात नाही. पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी आहे. आता मुस्लिम समाजाने डोळे उघडून पाहिले पाहिजे.

उद्धव ठाकरे भाजपसोबत यायला तयार होते

प्रश्न ः भाजप वापरून फेकून देते, अशी टीका केली जाते. ठाकरे ब्रँडला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वापरले. पवार ब्रँडला धक्का देण्यासाठी अजित पवारांना वापरले. पुढच्या टप्प्यात त्यांना महत्त्व दिले जाणार नाही. त्यांना सत्तेपासून वंचित केले जाईल. लोकसभा निवडणुकीतनंतर हे दिसेल, असा आरोप केला जातो, याबाबत आपले मत काय?

मुख्यमंत्री शिंदे ः या टीकेत तथ्य नाही. ती बिनबुडाची आहे. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री केले. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना मी धन्यवाद देतो. काम करण्याची संधी दिली. लोकसभेचे तिकीट वाटपही माझ्या इच्छेविरुद्ध झाले नाही. सर्व निर्णय संमतीने करतो. मात्र, यांना पोटदुखी आहे. आम्हाला वेगळं केलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो, तेव्हा हेच दिल्लीला फोन करून सांगत होते. त्यांना कशाला घेता आम्ही संपूर्ण पक्ष घेऊन तुमच्याबरोबर येतो. मात्र, दिल्लीकरांनी आपला शब्द पक्का ठेवला. माझ्या धाडसी निर्णयाचं कौतुक करीत त्यांनी यांना थारा दिला नाही.

हेही वाचा : 

Back to top button