राष्ट्रपती निवडणूक : ‘शरद पवारांनी हो म्हटलं असतं तर निवडणूक रंगतदार झाली असती’ | पुढारी

राष्ट्रपती निवडणूक : 'शरद पवारांनी हो म्हटलं असतं तर निवडणूक रंगतदार झाली असती'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले राष्ट्रपती होतात, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणूक लढवावी अशी ऑफर विरोधकांकडून आली होती. पण शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, जर पवार साहेब हो म्हणाले असते तर निवडणूक रंगतदार झाली असती. पारडं त्यांच्या बाजूने झुकलं असतं.

पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ ही राज्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत. देशभरातील गणित केलं तर सामना बरोबरीत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेससह इतर घटक पक्षांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला असला तरी खुद्द पवार यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पवार यांनीच आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे राजकीय क्षेत्रात सुरू झालेल्या चर्चेचा धुरळा खाली बसला आहे.

त्याच वेळी पवार यांनी उमेदवारीला नकार दिल्यानंतर विरोधी पक्षांकडून गुलाम नबी आझाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. स्वतः पवार यांनीही आझाद यांचे नाव पुढे केले आहे. दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली होती. परंतु या भेटीचा संदर्भ देत काँग्रेस राष्ट्रपतिपदासाठी पवार यांच्या नावाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीही पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले होते.

हे ही वाचा :

Back to top button