

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकारणात सक्रिय राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत 22 राजकीय पक्षांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला केवळ 16 विरोधी पक्षनेते उपस्थित होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी गोपाल कृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, असे सूत्रांनी सांगितले. आठवडाभरात विरोधी पक्षांची पुन्हा बैठक होऊन रणनिती ठरवली जाईल आणि राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल.
आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात संयुक्तपणे एक उमेदवार देण्याविषयी विरोधी पक्षांच्या बैठकीत एकमत झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी संयुक्तपणे एक उमेदवार उभा करण्यासाठी प.बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे बैठक बोलावली होती.
हेही वाचा