शरद पवार यांना फडणवीसांचा धोबीपछाड | पुढारी

शरद पवार यांना फडणवीसांचा धोबीपछाड

मुंबई ; नरेश कदम : सतत तेल लावून निसटणारे पहिलवान म्हणून ख्यातकीर्त असलेले शरद पवार यांनाच धोबीपछाड देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीचे मैदान मारले, इतकाच या निकालाचा अर्थ नाही. भाजपचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय पवार या दोन कोल्हापुरी पहिलवानांची निकाली कुस्ती जिंकताना फडणवीस यांनी सत्तारूढ महाविकास आघाडीतच आता अनेक कुस्त्या लागतील, अशी व्यवस्था केली. शिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते खेचून महाराष्ट्राची सत्ता तीन पक्षांकडे असली तरी खरे सत्ताकेंद्र फडणवीसच आहेत, हेदेखील अधोरेखित झाले.

सत्तारूढ महाविकास आघाडीकडे 165 आमदारांचे संख्याबळ असताना त्यांचा चौथा उमेदवार पराभूत होतो, हे अनपेक्षित आहे. पण केवळ संख्याबळ असून चालत नाही. असलेल्या संख्याबळाची योग्य पद्धतीने मांडणी करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही धुरंधर नेते विसरले. जिंकण्यासाठी 41 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. भाजपकडे तिसर्‍या जागेसाठी 28 मते असताना आणखी 13 मते खेचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक चाली रचत पवार-ठाकरे यांचा पट उधळून टाकला. संख्याबळाच्या जोरावर गाफील राहणार्‍या आणि टोमणे मारत बसलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाला त्यांचा दुसरा उमेदवार कसा पराभूत झाला हे कळलेदेखील नाही. मुळात संजय राऊत यांचा विजय निश्चित केल्यानंतर सेनेकडे तशी फक्त 13 मते शिल्लक होती.

आणखी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शिल्लक मते मिळाली तरी सेनेला अपक्ष आणि छोट्या पक्षांची 19 मते मिळवणे आवश्यक होते. या एकाच मुद्द्यावर रंगलेला सामना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असूनही गमावला आणि फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी असूनदेखील तो जिंकला. अशा कोणत्याही निवडणुकीत अपक्ष किंवा लहान पक्षांचा कल हा सत्तेच्या बाजूने असतो. मात्र या राज्यसभा निवडणुकीत हा कल प्रथमच विरोधी पक्षाच्या बाजूने झुकला. सत्तेपेक्षा विरोधी पक्ष पॉवरफुल असल्याचे दाखवून देण्याची किमया फडणवीस यांनी साधली.

राज्यसभेची सहावी जागा संभाजीराजे यांनी मागितली होती. पण शिवसेनेने हट्टाने या जागेवर संजय पवार यांना उभे केले. महाविकास आघाडीकडे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष 13 असे 165 आमदारांचे संख्याबळ होते. महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली तेव्हा अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता 163 आमदार तेव्हा हजर होते. हे संख्याबळ सरकारच्या बहुमताचे होते.

त्यावर राज्यसभेची शिल्लक जागा जिंकता येणार नाही, अशी स्थिती असताना खुद्द आघाडीतून सेनेच्या पराभवाच्या हालचाली सुरू असाव्यात, असा संशय घ्यायला जागा आहे. दुसर्‍या पसंतीच्या मतांचे आघाडीकडे नियोजन नव्हते किंवा ते ठरवूनच केले गेले नाही असे दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी दुसर्‍या पसंतीची मते सेनेला दिली असती तर निकाल वेगळा लागला असता. कारण भाजपचे महाडिक जिंकले ते दुसर्‍या पसंतीच्याच मतांवर. महाडिक यांना पहिल्या फेरीत 27 मते मिळाली आणि दुसर्‍या फेरीअखेर 41.58 मते मिळवत त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

शिवसेनेचे संजय पवार यांना दुसर्‍या फेरीअंती 39.26 मते मिळाली. आघाडीची दुसरी पसंती सेनेला नव्हती हे स्पष्ट आहे. घोडेबाजारामध्ये जे लोक उभे होते, त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलो नाही. आमचे जे घटक पक्ष आहेत, त्यांचे एकही मत फुटले नाही. पण कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जी नावे घेतली त्यात देवेंद्र भुयार (अपक्ष), संजयमामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांचा समावेश आहे आणि अपक्ष असले तरी हे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक समजले जातात.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही काही अपक्ष भाजपकडे पाठवल्याचे सांगत आमदार संतोष दानवे यांनी जाहीर आभारच मानले आहेत. आघाडीचे काही मंत्रीदेखील सेनेच्या विरोधात काम करत होते, अशी कुजबुज आता सत्तेच्या वर्तुळात ऐकायला येते. याचा अर्थ भाजपच्या या विजयाने आघाडी विरुद्ध आघाडी अशी कुस्त्यांची दंगलच होऊ घातली आहे.

राज्यसभेची निवडणूक रंगात आली असताना फडणवीस कोरोनाने आजारी पडले. पण आपल्या सागर बंगल्यात विलगीकरणात राहून एक एक अपक्ष, एक एक छोटा पक्ष जोडण्याची मोहीम त्यांनी राबवली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सरकारवर नाराज असले तरी फुटणार नाहीत, हे त्यांनी ओळखले. सत्ताधारी आमदार फोडण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा 13 अपक्ष आणि 16 छोट्या पक्षांचे आमदार खेचण्यासाठी फडणवीस यांनी जाळे टाकले. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांना त्यांनी भाजपकडे वळवले आणि त्याची गंधवार्ताही कुणाला लागू दिली नाही. त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधला. आगामी काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, हे ठाकूर यांना पटवून दिले.

फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजपचे नेते गिरीश महाजनदेखील ठाकूर यांच्या भेटीस गेले. ठाकूर यांची तीन मते निर्णायक ठरली. ठाकूर सोबत आल्याची खात्री होताच फडणवीस यांनी मग आघाडी सरकारला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांशी संपर्क साधला. हे सर्व अपक्ष आमदार आघाडीच्या बैठकीला हजर होते. यातील काही आमदारांनी तर आघाडीच्या उमेदवारांच्या अर्जावर सूचक म्हणून सहीदेखील केलेली होती. असे असताना आघाडीच्या तंबूतून आठ अपक्ष आमदारांची मते फडणवीस यांनी भाजपकडे वळवली.

बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांची अशी 12 मते भाजपकडे वळवली तरी फडणवीस यांचे नेमके काय सुरू आहे याचा अंदाज खुद्द भाजप नेत्यांनादेखील नव्हता.

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी या आमदारांची कामे केली होती. यात अनेक अपक्ष आमदार आहेत. ती जाणीव या आमदारांनी ठेवली. याउलट मुख्यमंत्री झाल्यापासून कधीही न भेटलेले उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने अचानक अपक्ष आमदारांना बैठकांना बोलावू लागले. हा फरक परिणामकारी ठरला.

एक एक मत महत्त्वाचे आहे हे ओळखून रुग्णशय्येवर असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान करावे, असे साकडे त्यांनी या आपल्या दोन्ही आमदारांना घातले. निकाल लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी हा मोठा विजय या दोन्ही आमदारांना अर्पण केला. नेतृत्वाची कसोटी पाहणारे असे क्षण फार दूरगामी परिणाम करणारे ठरतात. फडणवीस यांनी हा परिणाम सहजवृत्तीने साधलेला दिसतो.

लक्ष्मण जगताप हे गंभीर आजारी आहेत. कार्डियाक रुग्णवाहिकेतून ते मतदानाला आले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी फडणवीस खाली येऊन दारात उभे होते. त्यांना पाहून जगताप यांनी ‘सीएम साहेब, सीएम साहेब’ अशी हाक मारली. हा प्रसंग फार काही सांगून जातो. फडणवीस हे आजही भाजपच्या आमदारांना मुख्यमंत्री वाटणे खूप साहजिक आहे. पण फडणवीसच आपली कामे करू शकतात हा विश्वास अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही वाटतो आणि ते भाजपला मत देऊन मोकळे होतात, हा उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला फार मोठा पराभव म्हणावा लागतो.

तरीही महाडिक यांच्या विजयाची खात्री!

धनंजय महाडिक यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे बाद मत ग्राह्य धरले तरीही महाडिकच जिंकतात. मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मतदान केले असते तरी भाजपचा विजय पराजयात बदलणार नाही.

आपल्या तिसर्‍या उमेदवाराचा विजय असा निश्चित केल्यानंतर फडणवीस कोरोनामुक्त झाले. सागर बंगल्यावर भाजप नेत्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या. आघाडीच्या डावपेचांचा अंदाज ते घेत होते. एकीकडे आघाडीची रणनीती बाहेर पडत होती. पण फडणवीस यांनी आपली रणनीती बाहेर पडू दिली नाही. भाजपच्या प्रत्येक आमदाराला कोणाला मतदान करायचे आहे, याची सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे एकही मत बाद झाले नाही.

Back to top button