Presidential Elections : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण! | पुढारी

Presidential Elections : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी (Presidential Elections) विरोधकांची एकजूट करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत बोलावलेली विरोधी पक्षांची बैठक एकतर्फी असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. अशा एकतर्फी प्रयत्नांचे विपरीत परिणाम होतील आणि विरोधकांच्या ऐक्यालाच हानी पोहोचेल, असा त्यांनी टोला लगवाला आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. अशा स्थितीत सर्वच विरोधी पक्षांमध्ये गोंधळ वाढला आहे. आपला उमेदवार विजयी व्हावा, यासाठी पुन्हा एकदा विरोधी एकजुटीचा आवाज घुमू लागला आहे. या क्रमाने, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना पत्र लिहून १५ जून रोजी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे, जेणेकरून विरोधी पक्ष राष्ट्रपती निवडणुकीसाठी रणनीती तयार करू शकतील. (Presidential Elections)

ममतांची कृती एकतर्फी…

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सामान्यतः अशा बैठका परस्पर सल्लामसलत केल्यानंतरच बोलावल्या जातात. या बैठकीच्या आयोजनासंबंधी चर्चा सुरू होतीच पण ममता बॅनर्जी यांनी अचानक बैठकीबाबत एक वेळ आणि तारीख निश्चित करण्यात आली. त्यांची ही कृती एकतर्फी आहे. अशा निर्णयांमुळे विरोधी ऐक्याचे नुकसानच होईल, असे त्यांनी म्हटले. (Presidential Elections)

डी राजा यांच्याकडूनही ममतांना दणका

सीताराम येचुरी यांच्याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनीही ममता बॅनर्जींना मोठा धक्का दिला आहे. कोणताही पूर्व सल्लामसलत न करता अशा प्रकारे बैठक बोलावणे योग्य नाही. गोंधळ आणि गैरसमज निर्माण होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असा सल्ला त्यांनी ममतादीदींना दिला.

शिवसेना काय म्हणाली?

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मत मांडले. ते म्हणाले की, आम्हाला १५ जूनच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यावेळी आम्ही अयोध्येत असू. त्यामुळे आमच्या पक्षाचे एक प्रमुख नेते त्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी त्यांनी माहिती दिली.

दुसरीकडे, मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या वतीने या बैठकीत सहभागी होऊ शकतात, असे समजते आहे.

ममता यांच्यावर विरोधक खूश नाहीत

सूत्रांवर विश्वास ठेवला तर विरोधी पक्ष नेते ममता बॅनर्जींच्या या निर्णयावर खूश नाहीत. वरिष्ठ नेत्यांना डावलून ममता बॅनर्जी भाजपविरोधी चेहरा म्हणून स्वत:ला सादर करू इच्छितात, असे विरोधकांचे मत आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जींनी उचललेले हे पाऊल विरोधकांमध्ये तेढ निर्माण करून भाजपला मदत करत असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

Back to top button