Maratha Reservation : मराठा समाजाने संयम बाळगावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

Maratha Reservation : मराठा समाजाने संयम बाळगावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा समाजाचं आंदोलन भरकटतं चालल आहे. याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. हिंसक घटनांमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मराठा आरक्षणप्रश्‍नी मंत्रिमंडळ उपसमितीने आज बैठक झाली. यानंतर आयाेजित पत्रकार परिषदेत मुख्‍यमंत्री शिंदे बाेलत हाेते

मराठा समाजाने संयम बाळगावा

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आजचा (दि.३०) उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्यात मराठा ठिकठिकाणी आक्रमक झाले आहेत. या प्रश्‍नी आज (दि.३०) राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक आयोजित केली होती.

जुन्या कुणबी नोंदी आढळलेल्यांना प्रमाणपत्र देण्याचे सरकारचे आदेश

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. उद्या कॅबिनेटमध्ये तो अहवाल स्वीकारला जाईल. समितीला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या समितीने १ कोटी ७२ लाख कागदपत्रे तपासली, यातील ११ हजार ५३० कागदपत्रांमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आणखी नोंदी सापडतील, अस समितीच मतं आहे. लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ दाखले देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे, सुप्रीम कोर्टात रद्द झालेल्या मराठा आरक्षणावर सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध

मनोज जरांगे पाटील यांच्याशी उपसमितीचे प्रतिनीधी आणि अधिकारी चर्चा करतील. मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्याच काम सुरू आहे. कुणालाही फसवणार नाही. मराठा समाजाला टिकणार आणि इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. शिंदे समितीचे काम सुरू आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे. त्यांनी उभारलेला लढा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. सरकार आरक्षणाच्या मागणीसाठी गंभीर आहे. कायदा सुव्यवस्था राखा, मराठा आंदोलनकांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button