सातारा : मराठा आंदोलनाची धग वाढली; कुठे मुंडन तर कुठे राजीनामास्त्र | पुढारी

सातारा : मराठा आंदोलनाची धग वाढली; कुठे मुंडन तर कुठे राजीनामास्त्र

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनास सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची धग वाढत चालली आहे. पाचव्या दिवशी सातार्‍यात आंदोलनस्थळी परिसरातील गावातून मराठ्यांचे जथ्येच्या जथ्ये आले. भजन आंदोलनही करण्यात आले. माणमध्ये सामूहिक मुंडन करण्यात आले तर मायणी येथे एस. टी. बसेसवर काळ्या फुल्या मारत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. खंडाळा तालुक्यातील लोहमच्या सरपंचांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले. दरम्यान, जिल्ह्यात बाईक रॅली, कँडल मार्च, निदर्शने करण्यात आली. ‘जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मनोज जरांगे-पाटील यांनी दुसर्‍या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यानंतर सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून जिल्ह्यातील सुमारे 400 गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु असून दोघांनी प्राणांकित उपोषण सुरु केले आहे. वाई येथे आंदोलकांनी गुणरत्न सदावतेर्र्ंच्या प्रतिमेला जोडे मारुन संताप व्यक्त केला.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या साखळी उपोषणात रविवारी सातारा तालुक्यातील अंगापूरसह अनेक गावांनी पाठिंबा दिला. यावेळी चिंचणेर वंदन, कोंडवे, शाहूपुरी येथील नागरिकांनी भजन गायले. ढोलकी, टाळ-मृदूंगाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. माण तालुक्यात इंजबाव येथे आंदोलनकर्त्या मराठा बांधवांनी सामुहिक मुंडन केले. यावेळी गजीनृत्यावरही अनेकांनी फेर धरला. मायणी येथे आंदोलकांनी रस्ता रोको केला.

Back to top button