Hingoli Lok Sabha : ‘टोकाई’ने वाढवली शिवाजी जाधवांची डोकेदुखी; अपक्ष उमेदवारीमुळे भाजपची नाराजी | पुढारी

Hingoli Lok Sabha : 'टोकाई'ने वाढवली शिवाजी जाधवांची डोकेदुखी; अपक्ष उमेदवारीमुळे भाजपची नाराजी

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा: वसमत विधानसभा मतदार संघातून दोन्ही वेळेस उल्‍लेखनीय मतदान मिळाल्याने हौसले बुलंद झालेल्या भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी आता थेट महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करत बंडाचे निशाण फडकावले आहे. परंतू टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीसह ऊसाचे पैसे देण्यात अ‍ॅड. जाधव हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे  त्यांच्याविरोधात कारखान्याच्या क्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाचा फटका बसणार आहे. त्यातच भाजप पक्षश्रेष्ठींना न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपचा रोषही पत्करावा लागणार आहे. Hingoli Lok Sabha

दिल्‍ली येथील सर्वोच्च न्यायालयात विधीज्ञ असलेले अ‍ॅड. शिवाजी जाधव हे 2014 पासून जिल्ह्यात ओळखले जाऊ लागले. त्यांनी 2014 व 2019 ची वसमत विधानसभा निवडणूक लढविली. परंतू त्यांना त्यात यश आले नाही. कमी फरकाने त्यांचा पराभव झाला. टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची इमेज तयार केली होती. परंतू मागील दोन वर्षापासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची एफआरपी व ऊसाचे पैसे थकीत असल्याने त्यांच्याविरोधात वसमत तालुक्यात प्रचंड रोष आहे. तरीसुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी थेट महायुतीच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. Hingoli Lok Sabha

टोकाई कारखान्याच्या भागभांडवलाची विक्री करून शेतकर्‍यांची देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखाना विक्रीचे टेंडर सुद्धा निघाले असताना जाधव यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने ते नेमके मतदान कोणत्या तोंडाने मागणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अगोदरच महायुतीमध्ये नाराजीचा सूर असताना अ‍ॅड. जाधव यांचा अपक्ष लढविण्याचा पवित्रा महायुतीच्या उमेदवाराला धोक्याची घंटा समजली जात आहे.

एकीकडे दोन निवडणुकांचा अनुभव हाताशी असतानाही त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत थेट अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा त्यांच्याविरोधात राग आहे. सध्या ऊसाचे पैसे मिळावेत, यासाठी अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्याविरोधात सातत्याने कारखान्याच्या संचालकांसह ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आक्रमक भूमिका कायम असताना थेट लोकसभेच्या रिंगणात त्यांनी उडी घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी मागील हिशोब चुकता करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उचकून देणार्‍यांची कमी नाही. परंतु, जनमताचा कौल न घेता अ‍ॅड. जाधव यांनी लोकसभेसाठी अपक्ष लढण्याची घेतलेली भूमिका अनेकांना खटकणारी ठरत आहे.

Hingoli Lok Sabha  : …तर जाधवांना किंमत मोजावी लागणार ?

एकीकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा रोष असताना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमविणार्‍या जाधवांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या रोषालाही सामोरे जावे लागणार आहे. महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचे खापर अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यावर फोडले जाणार आहे. त्यामुळे जाधव यांना किंमत मोजावी लागण्याची शक्यता व्यक्‍त होऊ लागली आहे. स्थानिक उमेदवार म्हणून जाधव यांना उल्‍लेखनीय मतदान झाल्यास महायुतीचे उमेदवार कदम यांना फटका बसण्याची भीती व्यक्‍त होऊ लागली आहे. जाधव यांच्या उमेदवारीचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीचे आष्टीकर यांना होण्याची भीती व्यक्‍त होऊ लागली आहे.

टोकाई कारखान्याच्या शेतकर्‍यांची एफआरपीची 13 कोटींची देणी बाकी आहे. सध्या खाजगी बँकेकडे कर्जाबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. शेतकर्‍यांची थकीत देणी देणार आहे. राज्य शासनाने टोकाई कारखान्याला मदत केलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची विक्री होऊ देणार नाही. एकही पैसा मी खाल्लेला नाही. शेतकर्‍यांचा एकही पैसा थकीत  ठेवणार नाही.

  • चेअरमन अ‍ॅड. शिवाजी जाधव,  टोकाई सहकारी साखर कारखाना

हेही वाचा 

Back to top button