हिंगोलीत भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी मागे | पुढारी

हिंगोलीत भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी मागे

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाकरता अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. येथील लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्याने बाबुराव पाटील कोहळीकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. रामदास पाटील यांच्या दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य धोक्यात आले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी मागे घेण्याकरता मागील काही दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. या निमित्त राज्याचे मंत्री तथा भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी 7 एप्रिलला हिंगोलीत रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता त्यांनी बरीच मनधरणी केली परंतु मतदारांच्या आग्रहामुळे रामदास पाटील यांनी उमेदवारी संदर्भात सोमवारी निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून भविष्यात आपल्याला योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्याने रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलिंद यंबल, उमेश नागरे, शंकर बोरुडे, अभियंता पी. आर. देशमुख, हमीद प्यारेवाले आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : 

Back to top button