हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत एनटीसी भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची एक कार, दुचाकी, खंजर, लोखंडी रॉड, कटर जप्त केले आहे. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात आहे. या शिवाय दिवसा व रात्रीच्या वेळी गस्त सुरु करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार पांडुरंग राठोड, राजू ठाकुर, नितिन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांचे पथक हिंगोली शहरात गस्त घालीत होते.
यावेळी शहरातील एनटीसी भागात काही जण दरोड्याच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी पाच जण कार, दुचाकीवर असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच एक जण फरार झाला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे शेख इम्रान शेख कदिर (रा. सातोना ता. परतुर जि. जालना), ह.मु. मु. मस्तानशाहनगर (हिंगोली), सुनिल उर्फ पिंटु प्रकाश रूपनर, अजमदखान समदखान पठाण, सरताज तांबोळी सत्तार तांबोळी (सर्व रा. हिंगोली) असे सांगितले. तर फरार झालेल्या आरोपीचे नाव शेख अश्पाक शेख हमीद असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांच्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी दरोडा टाकण्यासाठी २ एप्रील रोजी नर्सी येथून चोरी घेतल्याचे स्पष्ट झाले. तसेच डिग्रस कऱ्हाळे शिवारातून कृषीपंप चोरल्याची कबुली दिली असून सदर कृषीपंप हिंगोली येथील दोन भंगार दुकानात विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.