मराठवाडा विद्यापीठात साकारली देशी आंब्यांची रोपवाटिका; १६ हजार कोयींपासून बनवली ८ हजार रोपे | पुढारी

मराठवाडा विद्यापीठात साकारली देशी आंब्यांची रोपवाटिका; १६ हजार कोयींपासून बनवली ८ हजार रोपे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात देशी आंब्यांची रोपवाटिका साकारली आहे. जिल्ह्यातील विविध गावांमधून गावरान आंब्याच्या १६ हजार कोयी जमा करुन त्यापासून ८ हजार रोपे बनविण्यात आली आहेत. आता गावरान आंब्यांच्या या रोपांना कलम करुन त्यांची विक्री केली जाणार आहे. त्यातून विद्यापीठाला ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या (जीएमएनआयआरडी) माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या संस्थेत ग्रामीण तंत्रज्ञान व नर्सरी व्यवस्थापन असे दोन अभ्यासक्रम चालविले जातात. गावरान आंब्याच्या कोयीपासून रोपे तयार करायची आणि त्या रोपांवर मराठवाड्यातील केशर, हुर, वनराज, आम्रपाली अशा प्रजातींचे कलम करण्याचे प्रकल्प संचालक डॉ. भगवान साखळे यांनी ठरविले. त्याला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ७५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

या निधीतून गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या पथकाने जिल्ह्यातील गंगापूर, सिल्लोड, कन्नड वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून गावरान आंब्याच्या १६ हजार कोयी जमा केला. त्या कमवा व शिका योजनेच्या बागेत आणल्या. त्यापासून रोपे तयार करण्यासाठी एकेका प्लास्टीक पिशवींमध्ये दोन कोयी टाकण्यात आल्या. आता एकेका पिशवीत दोन दोन रोपे तयार झाली आहेत.

मातृवृक्षाची कोय असल्यामुळे दोन रोपांपासून एकच कलम तयार केली जाणार आहे. गावरान आंब्याचे संवर्धन करण्यासाठी, त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे, असून येथील रोपांचे आयुष्य हे ३० ते ४० वर्षांवर राहील, असे डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न

सध्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थी कागदी लिफाफे तयार तयार करतात. त्यात फारसे कौशल्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोपांचे कलम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित विद्यार्थीच ८ हजार रोपांचे कलम ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात करणार आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना कलम करण्याचे कौशल्य प्राप्त होईल. त्यानंतर या रोपांची शेतकऱ्यांना विक्री केली जाणार आहे. या रोप विक्रीतून विद्यापीठाला सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

हेही वाचा;

Back to top button