विट्यात राजकीय भुकंपाची शक्यता? अजित पवारांसोबतच्या वैभव पाटील यांच्या व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चा | पुढारी

विट्यात राजकीय भुकंपाची शक्यता? अजित पवारांसोबतच्या वैभव पाटील यांच्या व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चा

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून खानापूर मतदार संघात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

आज (दि. २३) सायंकाळी एकीकडे भारताचे चंद्रयान -३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले आणि त्याच वेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत सांगली आणि तासगाव येथील काही राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उभा राहून काही भूमिका मांडताना दिसत आहेत.

या फोटोवरून ‘विट्याच्या पाटील गटाने अजित पवार यांच्याच बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती, अजितदादा लवकरच विट्याचा दौरा करणार, वैभव पाटील यांच्या या निर्णयाने खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार”, अशा अफवा व्हायरल झाल्या आहेत. याबाबत थेट वैभव पाटील यांच्याशी फोनवरून विचारणा केली असता ते म्हणाले, अजितदादा यांचा निरोप आला होता त्यानुसार मी बैठकीला गेलो होतो. त्यावेळी तिथे तासगा वचे प्रताप नाना पाटील यांच्यासह काही नेते शिवाय सांगलीचे भीमराव माने यांच्यासह काही नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्यावर आपल्या कार्यकर्त्यांचा दबाव आहेच. परंतु मी त्या बैठकीत तुम्ही आणि जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब एक राहिला तर बरे होईल. कारण आमची राजकीय अडचण आहेच, शिवाय पाटील साहेबांशी आमचे नातेसंबंधही आहेत त्यामुळे शेवटी योग्य तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असे आपण त्यांना सांगितले. शिवाय विद्यमान आमदार अनिलराव बाबर यांनी विटा शहर आणि पालि केचे जणू पालक त्व स्वीकारून कारभारात लक्ष द्यायला सुरुवात केले आहे, मागचा आणि पुढचा सगळाच निधी ते आणतायत काय कुणास ठाऊक ? असे म्हणत त्यामुळे इथून पुढे आम्ही आता ग्रामीण भागाकडे अधिकचे लक्ष देणार आहोत, त्यादृष्टीने अजित दादांची भेट महत्त्वाची होती. अजित पवार यांनी सांगली सह सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी अधिक बोलता येईल असेही वैभव पाटील यांनी सांगितले आहे.

Back to top button