लाचप्रकरणी तहसीलदार चंद्रकांत शेळकेंवर कारवाई, कार्यालयाची झाडझडती | पुढारी

लाचप्रकरणी तहसीलदार चंद्रकांत शेळकेंवर कारवाई, कार्यालयाची झाडझडती

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके व खाजगी इसम नारायण वाघ यांच्याविरुद्ध अवैद्य वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी १ लाख ३० हजारांची लाच मागितल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली होता. यानंतर औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी तहसील कार्यालयाची झाडझडती केली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज शासकीय पंचा समक्ष ताब्यात घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी गंगापूर -पैठण हद्दीतील शेंदुरवादा येथील खांब नदीतून अतिवृष्टीमुळे जमा झालेली वाळू उत्खनन व हायवा ट्रकद्वारे वाहतूक करण्यासाठी एका वाळू व्यवसायिकांकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात खाजगी वसुली करणारा इसम नारायण वाघ हा होता. यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके व नारायण वाघ यांना पथकाने चौकशासाठी ताब्यात घेतले होते.

यानंतर शनिवारी रोजी रात्री उशिराने पैठण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपाधिक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकाने लोकसेवक तहसीलदार चंद्रकांत शेळके व नारायण वाघ यांच्याविरुद्ध कारवाई करून तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे महसूल विभागातील राजपत्र अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली. सोमवार (दि.२५) रोजी दुपारी तीन वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकाने तहसील कार्यालयाची झाडझडती घेतली.

तसेच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या केबिन मधील कारवाईच्या दिवशी घडलेल्या प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज शासकीय पंच शिक्षक जनार्दन दराडे, निबंधक विभागाचे बबन मिसाळ यांच्या समक्ष जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार दत्तात्री निलावाड यांनी झाडझडती घेण्यासाठी आलेल्या पथकाला सहकार्य केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button