

टी २० वर्ल्डकप २०२१ मधील सगळ्यात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना पाकिस्तानने तब्बल १० विकेट राखून जिंकला. या विजयानंतर पाकिस्तानचे नेतृत्व करणारा बाबर आझम वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास बदलणारा कर्णधार ठरला. त्याने वर्ल्डकपमधील तब्बल १२ पराभवांची मालिका खंडित केली. याचबरोबर बाबर आझम वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा भारतीय संघाला पराभूत करणारा पाकिस्तानी कर्णधार ठरला.
बाबर आझमने या विजयानंतर फक्त त्यांच्या देशवासियांची मान उंचावली नाही तर आपल्या पालकांचीही गर्वाने छाती मोठी केली. बाबर आझम ज्यावेळी ऐतिहासिक विजय साकारत होता त्यावेळी त्याचे वडील देखील मैदानातच उपस्थित होते. सध्या त्याच्या वडिलांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. मात्र वरची फळी स्वस्तात परतल्याने भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहली ( ५७ ) आणि ऋषभ पंत ( ३९ ) यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांच्या खेळीमुळे भारताने १५१ धावा केल्या.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने दमदार फलंदाजी केली. सलामीला आलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता नाबाद १५२ धावांची सलामी देत सामना १० विकेट्सनी जिंकला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली.
पाकिस्तानने भारताचा पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभव केल्यानंतर दुबईच्या स्टेडियममधील पाकिस्तानी चाहत्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. सर्वजण हा ऐतिहासिक विजय साजरा करत होते. मात्र ज्यावेळी बाबर आझम विजयी धाव धावला त्यावेळी एक चाहते खुर्चीवर बसून होता. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू होते. हे चाहते दुसरे तिसरे कोणी नसून ते बाबर आझमचे वडील होते.
बाबर आझमच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूनी डबडबलेले पाहून आजूबाजूच्या चाहत्यांनी त्यांना विजयाच्या जोशपूर्ण शुभेच्छा दिल्या. हा भावनिक व्हिडिओ मजहर अरशद नावाच्या एकाने ट्विटर युजरने ट्विट केला आहे. या व्हिडिओला सध्या ६१८.४ k इतके व्ह्युज मिळाले असून हे ट्विट ४ हजार ९२० लोकांनी रिट्विट केले आहे.