Ashram 3: ‘आश्रम’च्या सेटवर हल्ला, दिग्दर्शक प्रकाश झा यांना काळे फासले | पुढारी

Ashram 3: 'आश्रम'च्या सेटवर हल्ला, दिग्दर्शक प्रकाश झा यांना काळे फासले

भोपाळ : पुढारी ऑनलाईन

आश्रम 3 वेब सीरिजचे ( Ashram 3 ) दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी दिलेली प्रतिक्रिया त्यांना चांगलीच महागात पडल्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत प्रकाश झा यांनी आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणात त्यांचं मत मांडलं होतं. ते म्हणाले होते की, हे नेमकं काय प्रकरण सुरू आहे याविषयी मला फारसं काही माहित नाही. पण, इतकं नक्की म्हणेन की एक स्टार किड फार मोठ्या संकटात सापडला आहे’. या वक्तव्यानंतर प्रकाश झा यांना बजरंग दलाच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची चर्चा आहे.

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे रविवारी संध्याकाळी ‘आश्रम 3’ ( Ashram 3 ) या वेबसिरीजच्या शूटिंग दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेटवर हल्ला करत तोडफोड केली. यावेळी निर्माता, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकून त्यांना काळे फासण्यात आले. आश्रमच्या सेटवर गोंधळ झाल्याची माहिती मिळताच पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहचला आणि त्यांनी बजरंग दलाच्या संतप्त कार्यकर्त्यांना परिसरातून बाहेर काढले.

‘अरेरा हिल्स’ येथील जुन्या जेल कॉम्प्लेक्समध्ये आश्रम ३ वेब सीरिजचे शूटिंग सुरू आहे. रविवारी सायंकाळी अचानक बजरंग दलाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत हल्ला केला. तसेच वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाई फेकण्यात आली. कार्यकर्त्यांनी युनिटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. व्हॅनिटी व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड केली. या घटनेवेळी ‘आश्रम-३’मध्ये ( Ashram 3 ) मुख्य भूमिका वठवणारा अभिनेता बॉबी देओल यावेळी उपस्थित होता.

या घटनेनंतर बजरंग दलाचे सुशील सुदेले यांनी एका वाहिनीशी संवाद साधताना प्रकाश झा यांना मालिकेचे नाव बदलावे लागेल, असा इशारा दिला. प्रकाश झा यांनी नाव बदलण्याचे आश्वासन दिल्याचेही सुशील यांनी सांगितले. नाव बदलले नाही तर शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर मालिका रिलीज होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भोपाळचे डीआयजी इर्शाद वली यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत पोलिसात कसलीच तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हल्‍ला करणाऱ्‍यांविरोधात प्रकाश झा किंवा त्‍यांच्‍या क्रु सदस्यांनी कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आम्ही या घटनेत सहभागी असलेल्या लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं वली म्हणाले.

आर्यन प्रकरणी काय म्हणाले प्रकाश झा…

एका मुलाखतीत झा म्हणाले, ‘मला या प्रकरणात अधिक माहिती नाही. प्रकरण नक्की कोणच्या दिशेने जात आहे. यामध्ये कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत. पण एवढं नक्की सांगू शकतो स्टारकिड मोठ्या अडचणीत सापडला आहे. मला नाही माहिती यावर काय प्रतिक्रिया द्यायला हवी…’

मला नाही माहिती याप्रकरणी लोक नक्की काय कमेन्ट करतील. मी पूर्ण प्रकरण वाचलं देखील नाही पण शाहरुख खानचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला आहे… त्याला या अडणीतून बाहेर काढणं अधिक कठिण झालं आहे.’ त्यामुळे ड्रग्स प्रकरणी आर्यनला कधी दिलासा मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Back to top button