दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील प्रवाशांचा एसटी प्रवास महागला | पुढारी

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील प्रवाशांचा एसटी प्रवास महागला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

डिझेल दरवाढ, कोरोनामुळे कमी झालेले प्रवासी उत्पन्न, महागाई भत्त्यासह अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे एसटी महामंडळावरील आर्थिक भार वाढत आहे. परिणामी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यानुसार आज पासून १७ टके भाडेवाढ करण्यात आली आहे. पहिल्या टप्याला ( ६ किमी ) ही भाडे वाढ लागू होणार नाही. यापुढे ९० किमी प्रवासकारिता ११५ रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी ९० रुपये दयावे लागत होते. म्हणजेच २५ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात डिझेलच्या १६ हजार बस असल्याने करोना काळाआधी प्रतिदिन साडेबारा लाख लिटर डिझेल लागत होते. आता प्रवासी संख्या जरी कमी असली तरी दहा हजार बसगाड्या धावतात आणि त्यासाठी दिवसाला आठ लाख लिटर डिझेल लागते. २०१८ मध्ये एसटी महामंडळाने डिझेल दरवाढीमुळे १८ टक्के भाडेवाढ के ली होती. तेव्हा ७१ रुपये ८५ पैसे प्रतिलिटर असा डिझेलचा दर होता. १ जून २०२१ ला हाच दर ९१ रुपये ६९ पैसे झाला. आता डिझेलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा : 

त्यामुळे महामंडळावरील आर्थिक भार वाढला. महिन्याला ७५ कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त वाढ आहे. त्यातच कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली. उत्पन्न कमी झाल्याने महामंडळाला मार्च २०२० पासून ते आतापर्यंत पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

महागाई भत्ता ७ टक्क्यांवरून १२ टक्के झाला आणि त्यामुळे महामंडळावर ५३ कोटी रुपयांचा भार पडला आहे. इंधन खर्च, टायर खर्चासह अन्य खर्च वाढल्याने वर्षाला ९५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार एसटी महामंडळ सहन करत आहे.

Back to top button