छत्रपती संभाजीनगर: आमदाबाद येथील शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: आमदाबाद येथील शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

नाचनवेल; पुढारी वृत्तसेवा: ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी रिक्त पदे न भरल्याने कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळे ठोकले. रिक्त पदे जोपर्यंत भरत नाहीत, तोपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

आमदाबाद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या १२० असून पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी एक जागा रिक्त आहे. शिक्षकांअभावी आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांना खासगी शाळेमध्ये घालण्याची आमची आर्थिक परिस्थिती नाही. परंतु, शिक्षकाची नियुक्ती न केल्यास आम्ही मुलांचे दाखले काढून घेऊ. त्यामुळे शिक्षण विभागाने तत्काळ कायमस्वरूपी शिक्षक द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

केंद्रप्रमुख डी . टी .शिंदे यांनी पालकांशी संवाद साधला. परंतु पालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने केंद्रप्रमुख यांनी शाळेला कुलूप लावल्याचा पंचनामा केला. यावेळी मुख्याध्यापक कमलाकर सुरडकर, सरपंच नर्सिंग सोनवणे, उपसरपंच दिनेश बनकर, विनायक चौधरी, बाळु बनकर, विजय साळवे, तंटामुक्त अध्यक्ष पोपट बनकर, विजय बनकर, भिकन खंडागळे, देविदास ढमाले, एकनाथ महाराज बनकर, भाऊसाहेब ढमाले, बाळाराम बनकर, श्रीराम ढमाले, महिपतराव बनकर, पोपट बनकर, राजू बनकर आदीसह पालक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button