छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराजांची पालखी जुने दादेगाव गावकऱ्यांनी अडवली | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराजांची पालखी जुने दादेगाव गावकऱ्यांनी अडवली

पैठण (चंद्रकांत अंबिलवादे) : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी पैठण पंचक्रोशीतून शनिवारी श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रस्थान झाला असून पहिला मुक्काम चनकवाडी या गावात झाला. त्यानंतर आज सकाळी दुसऱ्या मुक्कामासाठी हातगाव येथे पालखी मार्गस्थ झाली असताना पैठणच्या दादेगावमधील गावकऱ्यांनी पालखी अडवली.

पैठण तालुक्यातील जुने दादेगाव या गावातील पालखी मार्ग खराब असल्यामुळे यावर्षी नाथांचा पादुका सोहळा गावात येणार नाही, असा निर्णय पालखी पंच कमिटीने दादेगाव ग्रामस्थांना अगोदरच कळविला होता. मात्र येथील ग्रामस्थांनी सकाळी जवळपास एक तास नाथांचा पालखी सोहळा पालखी मार्गावर रोखून दादेगावमध्ये पालखी नेण्यासाठी आंदोलन केले. शेवटी पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले व गावकरी यांच्यात सपोनि लक्ष्मण केंद्रे, जनाबाई सांगळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, संजय मदने, मनोज वैद्य यांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली. त्यानंतर पुढील वर्षी दादेगाव ग्रामस्थांनी गावाबाहेर विसावा ओटा निर्माण करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे पालखी सोहळ्याच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर नाथांच्या पादुका पालखी रथ दादेगावमध्ये जाण्यासाठी मार्गस्थ झाला. परंतु सोहळ्यात सहभाग असलेले हजारो वारकरी या गावात न जाता सरळ पुढील गावाकडे मार्गस्थ झाले.

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील सोहळ्यातील वारकऱ्यांना अडचण ठरणाऱ्या गावातील रस्ते दुरुस्ती झाल्यास यावर्षी पालखी सोहळा गावात येईल, असा पंच कमिटीचा निर्णय पालखी सोहळ्याच्या वतीने सोहळा मार्गस्थ होण्यापूर्वी दादेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाण येथील ग्रामस्थांना सांगण्यात आला होता.
-रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले, पालखी प्रमुख

हेही वाचा : 

Back to top button