छत्रपती संभाजीनगर : ऑरिकमध्ये होणार ड्रोन क्लस्टर | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : ऑरिकमध्ये होणार ड्रोन क्लस्टर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय ड्रोन उद्योग पुढील दहा ते बारा वर्षांत वाढणार आहे. तसेच देशाच्या सुरक्षेचा विचार करता, आपल्याला ड्रोन तंत्रज्ञान विकसित करावेच लागेल, या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऑरिक येथे गोदावरी ड्रोन क्लस्टरची स्थापना करण्यात येणार असून, सरकारने याबाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारला पाठवला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऑरिक येथे ५० एकर जागेवर विकसित होणारे ड्रोन क्लस्टर लघु आणि मध्यम उद्योगांना ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याला मोठी मदत करेल. ड्रोन क्लस्टरमुळे स्वदेशी ड्रोन उत्पादनाला चालना मिळणार असून, प्रमुख उत्पादक नजीकच्या काळात बिडकीन येथे मोठी गुंतवणूक करतील. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून या क्लस्टरची निर्मिती होणार असून, ऑरिकदेखील यामध्ये वाटा उचलणार आहे.
यासंदर्भात मॅजिक स्टार्टअप विकेंड दरम्यान सिडबी बँकेनेदेखील प्रकल्पासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी देशाचे अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरुवात होऊ शकते.

डिफेन्स हब म्हणून विकसित होणार बिडकीन

ऑरिक, बिडकीन येथे ड्रोन क्लस्टरसोबतच डिफेन्स हब विकसित होणार असून या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी येथे गुंतवणुकीला अनुकूलता दर्शवली आहे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात येथे स्वतंत्र हवाई धावपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे येत असून, संरक्षण उत्पादन क्षेत्राला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे प्रकल्प अहवालात देण्यात आली आहे. या ड्रोन क्लस्टरमध्ये प्रायोगिक उत्पादन आणि चाचणी सुविधांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामान्य चाचणी आणि प्रमाणन केंद्र, चाचणी आणि प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास केंद्र, संशोधन डिझाइन आणि विकास केंद्र, ड्रोन पायलट अकादमी आदींचा समावेश असेल.

Back to top button