नांदेड : बाचोटी येथे जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग; पहिल्या वर्षी १८ लाखाचे उत्पन्न | पुढारी

नांदेड : बाचोटी येथे जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग; पहिल्या वर्षी १८ लाखाचे उत्पन्न

कंधार : भागवत गोरे :  निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पिकांच्या उत्पादनातील आणि भावातील अनिश्चितता, ऊसाच्या पिकाला रात्री बे रात्री पाणी देण्याचा त्रास या सर्व गोष्टीला फाटा देत कंधार तालुक्यातील बाचोटी येथील शिवशंकर धोंडगे या शेतकऱ्याने आधुनिक शेतीकडे वळत सुरुवातीला साडेचार एकरमध्ये जिरेनियम या सुगंधी व औषधी वनस्पतीची लागवड केली. यातून‌ एकरी तब्बल चार लाखाचे उत्पन्न मिळविण्यात यश आल्याचे ‘दै. पुढारी’ शी बोलताना सांगितले.

बाचोटी येथील शेतकरी सदाशिव धोंडगे यांना तीन मुले आहेत. त्यापैकी बालाप्रसाद सदाशिव धोंडगे हे डॉक्टर आहेत. यांनी जिरेनियमच्या शेतीची पाहणी केली. त्याची मशागत, तेल कसे काढायचे ? याचा अभ्यास केला व आपले बंधू शिवशंकर यांना जिरेनियमबद्दल माहिती आणि शेतात लागवड करण्यासाठी सल्ला दिला. यानंतर उत्पन्नाचा विचार करता ही शेती फायदेशीर राहिल असे समजून पहिल्या वर्षी सुमारे साडेचार एकरमध्ये शिवशंकर धोंडगे यांनी जिरेनियमची लागवड केली. याचे तेल काढण्यासाठी ८ लाख रुपयांचा प्लांट बसविला आणि यासाठी प्लांटवर २ लाखाचे शेड मारले. पहिल्याच वर्षी एकरी चार लाख असे साडेचार एकरमध्ये १८ लाखाचे उत्पन्न मिळविण्यात यश मिळाले.

मार्च २०२१ मध्ये जिरेनियम लागवड करण्याचे ठरल्यानंतर देगलूर कांड्या, नारायणगाव, जुन्नर व कोपरगाव येथून रोपे खरेदी केली. एका रोपाची किंमत ३ ते ५ रुपयांच्या दरम्यान होती. एकरी ८ हजार रोपांची ४ बाय सव्वा फुटावर लागवड करण्यात आली. यानंतर ठिबक सिचनाच्या माध्यमातून ह्युमिक ॲसिड, १२:६१:० खत अमोनियम सल्फेट यांचा डोस दर बारा दिवसांनी दिला. या लागवडीसाठी औषध मजूरासह एकरी केवळ १५ हजार रुपये खर्च आला. वर्षातून चार वेळा जिरेनियमची कटींग करता येते. एका एकरमध्ये वर्षाकाठी ४० किलो तेलाचे उत्पादन होते. या तेलाला गेल्यावर्षी १२ हजार ५०० रुपये भाव भेटला होता. म्हणजेच, एकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न होणे अपेक्षित होते. परंतु, वर्षातून तीनच भार घेत आल्याने एकरी चार लाख असे साडेचार एकरमध्ये १८ लाखाचे उत्पन्न मिळविता आले असल्याचे यावेळी शिवशंकर धोंडगे यांनी सांगितले.

जिरेनियमपासून बनलेले तेल सौंदर्य प्रसाधनांमधील सुगंध टिकवून ठेवण्याचे काम करते. त्यामुळे याला मागणी मोठी आहे. सोबतच आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जिरेनियम तेल विक्रीसाठी मुंबई येथील मुलूंड येथे केळकर इंटरनॅशनल कंपनी तेल खरेदी करते. तेलाचा वाहतुकीवर होणारा खर्च हा अत्यल्प आहे. सध्या साडेचार एकरवरील जिरेनियमची आता १२ एकरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यासाठी दोन नोकरदार व आठवड्यातील सातही दिवस पाच महिला मजूराच्या माध्यमातून काम पाहिले जात आहे. यापुर्वी या सर्व शेतीमध्ये ऊसाची लागवड केली जात होती. यात एकरी दीड लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न होत असे. परंतु, त्याची निगा करण्यासाठी अपार कष्ट करावे लागत असत. आता ऊसाची शेती बंद केली असून १२ एकरवर जिरेनियमची लागवड केली आहे.

लागवडीसोबत रोपनिर्मितीची विक्री

कंधार तालुक्यात बाचोटी, बाळांतवाडी, कंधार व‌ वंजारवाडी येथे जिरेनियमची शेती केली जात आहे. परंतु, बाचोटी येथील जिरेनियमची शेती यशस्वी होत असून त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. केवळ लागवडी नाही तर रोपनिर्मिती करुन विक्री करणेही सुरु केले आहे.

जिरेनियम सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड केल्यानंतर यशस्वी होईल का नाही? याची भिती होती. परंतु, सांगितलेल्या उत्पन्नाचा विचार करता किमान ५० टक्के जरी झाले तरी चालेल. हा विचार करून लागवड केली. त्याला यश आले असून मी पहिल्या वर्षी एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झालो. आज आमच्याकडील सर्व ऊस काढून टाकला असून त्या सर्व शेतामध्ये जिरेनियमची लागवड केली आहे.
– शिवशंकर सदाशिवराव धोंडगे (शेतकरी, जिरेनियम लागवड ,बाचोटी, ता.कंधार )

हेही वाचा : 

Back to top button