व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला दुभंगलेल्या २३ जोडप्यांचा संसार पुन्हा फुलणार

व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला दुभंगलेल्या २३ जोडप्यांचा संसार पुन्हा फुलणार

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, या हेतूने शनिवारी रायगड जिल्ह्यात लोकन्यायालय घेण्यात आले. यामध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण ३७ हजार ७६३ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आली आहेत. तर २३ जोडप्यांचे दुभंगलेली मने पुन्हा जुळली आहेत. संसार मोडण्याच्या तयारीत असताना राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये या जोडप्याचे म्हणणे एकूण घेत त्यांना नव्याने संसार सुरु करणायची उमेद जागी करून देण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सावंत व पॅनलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देवून या जोडप्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण ९८ हजार ६२३ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये विशेष बाब म्हणजे २३ जोडप्यांची घटस्फोटाची प्रकरणे ठेवण्यात आली होती, तडजोडी अंती २३ जोडप्यांनी सन्मानपूर्वक घटस्फोट रद्द करून पुन्हा आपले संसार फुलविले आहेत. लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलिस अधिक्षक रायगड व पोलिस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण झाला कि ते नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात केले जाते. मात्र लग्नाची ही नाती तुटू म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत न्यायालयही आटोकाट प्रयत्न करीत असते. न्यायालयाने लोक अदालतच्या माध्यमातून नव्या प्रेमाचा समेट घडवून आणल्याने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या घटस्फोट प्रकरणापैकी तडजोडीअंती २३ जोडप्यांनी सन्मानपूर्वक घटस्फोट रद्द करून आपले संसार पुन्हा फुलविले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news