चारशे महिला प्रज्वलच्या वासनेच्या शिकार; महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नींचेही शोषण | पुढारी

चारशे महिला प्रज्वलच्या वासनेच्या शिकार; महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नींचेही शोषण

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : हासन मतदारसंघाचा खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याने आपल्या निरंकुश सत्तेचा वापर करून सुमारे 400 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात कर्नाटक प्रशासनातील महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नी आणि त्याच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. ही संख्या 90 असल्याचे सांगण्यात येते.

‘पॉवर करप्टस् अँड अ‍ॅब्सोल्यूट पॉवर करप्टस् अ‍ॅब्सोल्यूटली’ अशी इंग्रजी म्हण आहे. सत्ता माणसाला अहंकारी बनवते आणि निरंकुश सत्ता सत्तांध बनवते, असा तिचा अर्थ. माणूस सत्तांध बनला की, ना त्याला कायदा दिसतो, ना नैतिकता; मग तो दिसेल त्याला, जमेल तसे लुटत सुटतो, पिळवणूक करत सुटतो, शोषण करतो. तेच कर्नाटकात घडल्याचे उघडकीस आले आहे. त्याबद्दल प्रज्वलवर तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने विशेष पथक नियुक्त केले असले, तरी गेले एक महिना हा खासदार देशाबाहेर ‘फरार’ आहे. गेल्या 27 एप्रिलला तो जर्मनीला गेल्याची नोंद परराष्ट्र खात्याकडे आहे; पण सध्या तो जर्मनीत नाही. तो कुठे आहे, हे कुणालाही माहीत नाही.

कामातुराणं न भयं, न लज्जा… या उक्तीप्रमाणे सुरुवातीपासूनच स्त्रीलंपट अशी प्रतिमा असलेल्या प्रज्वलने 400 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पैकी 90 महिला या अधिकारी, नेत्यांच्या बायका किंवा निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्या आहेत. प्रज्वलने महिलांचे लैंगिक शोषण करत असताना स्वतःच त्या कृत्यांचे मोबाईलवर व्हिडीओ चित्रणही केले आहे. त्यावर कळस म्हणजे त्या व्हिडीओ चित्रणाची भीती दाखवून त्याने त्या महिलांना वारंवार आपल्या वासनेची शिकार बनवले आहे, असे तपासातून पुढे येत आहे.

अनेकजणी प्रज्वलचा कारनामा मोलकरणीपुरता मर्यादित नाही, तर त्याचा स्वपक्ष म्हणजे निधर्मी जनता दलाच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या बायकांवरही त्याची नजर पडली होती. काही अधिकार्‍यांच्या पत्नींनाही त्याने आपली शिकार बनवले आहे. पक्षाच्या काही कार्यकर्त्याही कधी त्याच्या आमिषाला, तर कधी धमकावणीला बळी पडल्या आहेत, असे ‘एसआयटी’ तपासातून पुढे येत आहे. जेव्हा जेव्हा प्रज्वलची पत्नी बाहेरगावी असायची, तेव्हा तेव्हा प्रज्वलची कामेच्छा उचल खायची अन् तो अशी कृत्ये करायचा, असेही स्पष्ट होत आहे.

प्रशासकीय महिला अधिकार्‍यांना बढती, इच्छितस्थळी बदली, अशा लाभांचे आमिष दाखवून प्रज्वलने त्यांचे लैंगिक शोषण केले आहे; तर स्वपक्षातील महिला कार्यकर्त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्याचे तसेच सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फायदा उचलला. नेत्यांच्या पत्नींवरही त्याने असे उच्च पदांचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा संशय आहे.

प्रज्वल स्त्रीलंपट आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेली काही वर्षे आहे. ही चर्चा आणि काही व्हिडीओ गेल्या जूनमध्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांपर्यंतही पोहोचले होते. मात्र, आपले बिंग फुटणार, हा अंदाज येताच खासदार प्रज्वलने न्यायालयात धाव घेऊन काँग्रेस नेत्यांसह बंगळुरातील 21 प्रसार माध्यमांविरुद्ध मनाई आदेश मिळवले होते. पुराव्यांशिवाय प्रज्वलविरुद्ध काहीही बोलू, छापू अथवा दाखवू नये, असा तो न्यायालयाचा आदेश होता. ‘अश्लील व्हिडीओंमध्ये मी नाही, तर दुसर्‍याच्या चेहर्‍यावर माझा चेहरा लावून बदनामीचा कट आखण्यात आला आहे,’ असा युक्तिवाद त्यावेळी प्रज्वलने केला होता.

प्रज्वलच्या मतदारसंघासह पहिल्या टप्प्यात कर्नाटकात मतदान झाले 26 एप्रिलला. दुसर्‍या दिवशी म्हणजे 27 एप्रिलला प्रज्वल डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या आधारे जर्मनीला गेला. तो 10 मेच्या सुमारास परतणार होता. मात्र, 28 एप्रिलला त्याच्याविरुद्ध तसेच त्याचे वडील आमदार रेवण्णांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंद झाली आणि प्रज्वल जर्मनीतूनच बेपत्ता झाला. तो आजपर्यंत परतलेला नाही. तो कुठे आहे, हेही कुणाला माहीत नाही.

मोलकरणीने केलेल्या तक्रारीकडे ‘त्याच्या’ आईचे दुर्लक्ष

प्रज्वल आज 33 वर्षांचा आहे. 2017 च्या दरम्यान म्हणजे ऐन पंचविशीत त्याने घरातील मोलकरणीचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ बनवल्याची नोंद तक्रारीत आहे. ही मोलकरीण म्हणजे प्रज्वलच्या आईच्या माहेरगावची रहिवासी. ती ओळखीची होती म्हणूनच प्रज्वलच्या आईने तिला घरी कामाला ठेवले होते; पण त्याचा गैरफायदा प्रज्वलने घेतला. हा प्रकार पहिल्यांदा घडला, तेव्हाच मोलकरणीने प्रज्वलच्या आईकडे तक्रार केली होती; पण त्याच्या आईने दुर्लक्ष केले. त्यामुळे मोलकरणीने काम सोडलेे. तरीही प्रज्वल त्यांना व्हिडीओ कॉल करायचा, असे पोलिस तक्रार सांगते.

Back to top button