Milk Business : ‘या’ शेतकऱ्याची दुग्धव्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल | पुढारी

Milk Business : 'या' शेतकऱ्याची दुग्धव्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल

कंधार; भागवत गोरे : “केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे” या म्हणीचा प्रत्यय कंधार तालुक्यातील वळसंगवाडी येथील ज्ञानोबा लाळे या शेतकऱ्याच्या कर्तुत्वावरुन पहायला मिळते. या शेतकऱ्याने नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा बदलत्या काळानुसार दुग्धव्यवसायातुन आर्थिक अडचणींवर मात केली आहे. आज या शेतकऱ्याकडे तब्बल १३ म्हैशी व २ गायी आहेत. यातून दरमहा लाखोंची रुपयांची उलाढाल होत असून तब्बल ५० हजारांचा निव्वळ नफा मिळविण्यात या शेतकऱ्याला यश मिळाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आलेले दिसून येते. काही शेतकरी नशिबाला दोष देत हाताश झालेले पहायला मिळतात. मात्र ज्ञानोबा हे हाताश न होता अशा परिस्थितींमधून बाहेर पडलेले पहायला मिळते. त्यांनी अनेक पर्यायांमधून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.

२००४ साली त्यांनी शिवणकामाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागविण्याचा प्रयत्न केला. परंतू ग्रामीण भागात या व्यवसायाला पाहिजे तेवढे यश आले नाही. मद्यपानाच्या आहारी गेलेल्या ज्ञानोबा हे म्हणायचे की, ”मला नरेंद्र स्वामीच्या आशीर्वादाने मार्ग मिळाला असून मी आज मद्यपानापासून दूर आहे. सध्या मी व माझे कुटुंब आनंदात आहोत.”

सहा वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेला एक बैल विकला आणि एक म्हैस खरेदी केली. त्यानंतर पिक कर्ज घेवून म्हैशींची संख्या वाढविली. आज त्यांच्याकडे १३ म्हैशी व २ जर्सी गायी आहेत. यातून केलेल्या दुध विक्री व्यवसायाधून जवळपास एक लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र असे असले तरी या व्यवसायासाठी खर्च देखील भरपूर आहे. चाऱ्यावर होणारा खर्च, चाऱ्याची लागवड करावी लागते. त्यांच्याकडे दीड एकरमध्ये ऊस आहे. त्याचाही ते जनावराच्या चाऱ्यासाठी वापर करतात.

त्यांनी स्वत: चा टेलरिंग व्यवसाय बंद करून रामेश्वर व साईनाथ या त्यांच्या दोन मुलांना यांनी आधुनिक शेतीपूरक व्यवसायाकडे वळविले. त्यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांना हातभार लावून या छोट्याशा वाडीवर एक वेगळा आदर्श ठेवला. वाडीवर त्यांची स्वत: ची एक दूध उत्पादक ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा

Back to top button