सीमाभागातील ‘या’ 14 गावांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली | पुढारी

सीमाभागातील 'या' 14 गावांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली

पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या महाराष्ट्रात सीमावादाचा प्रश्न चांगलाच तापत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमाभागातील गावांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. त्यानंतर आता महाराजगुडा, नाके वाडा यांसह 14 गावांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणात समाविष्ट होण्यासाठी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पेटू शकण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वसलेल्या महाराजगुडा, नाके वाडा यांसह १४ गावांतील ग्रामस्थांनी तेलंगणात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली कारण सीमाभागाचा प्रश्न महाराष्ट्रात तापत आहे. एकीकडे बेळगाव आणि अन्य सीमाभागातील गावे महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील 14 गावे सोयी-सुविधा मिळत नाही म्हणून महाराष्ट्रातून तेलंगणात सामील होण्यासाठी उत्सूक आहेत.

एएनआय वृत्त एजन्सीने याबाबतचे ट्विट केले आहे. त्यात नाके वाडा गावचे उपसरपंच सुधाकर जाधव म्हणतात, “लोकांना तेलंगणा सरकारकडून लाभ मिळत आहेत. मी महाराष्ट्राला आवाहन करतो की इथल्या लोकांना अधिकाधिक योजनांचा लाभ द्यावा.”

“लोकांना तेलंगणात विलीन व्हायचे आहे कारण त्यांना तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत बरेच फायदे मिळत आहेत. तेलंगणा सरकार येथील ज्येष्ठ नागरिकांना 1,000 रुपये पेन्शन, 10 किलो रेशन आणि इतर अनेक फायदे देते,” असे येथील नाके वाडा गावचे एक नागरिक विजय यांनी म्हटले आहे.

तर या प्रकरणावर राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले आहे, ”14 गावांतील 70-80% लोकांना महाराष्ट्रात राहायचे आहे. असे काही लोक आहेत ज्यांना तेलंगणात विलीन व्हायचे आहे पण त्यांच्या संख्या खूप कमी आहे. शेतजमिनीचे मालकी हक्क देण्याचे कामही सुरू आहे.

Back to top button