धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील | पुढारी

धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर-2022 महिन्याच्या ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. तर धुळे मंडलातील १ लाख १ हजार ५०० ग्राहकांनी २० कोटी ५० लाख रुपये भरले आहेत. महावितरणच्या प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळाल्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. ग्राहक महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाइन वीजबिल भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. तसेच महावितरणचे मोबाइल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा २४ तास उपलब्ध असल्याने वीज ग्राहकाला वीजबिल केव्हाही आणि कोठूनही भरता येते. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा:

Back to top button